- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपुर समाचार : नागपूर मधे २०३० पर्यंत रेबिजचे उच्चाटन करण्यासाठी श्वानांची लसीकरण मोहिम सुरू

नागपूर महानगरपालिका आणि मिशन रेबिज ह्या रेबिज दूर करण्यासाठी समर्पित संस्था

नागपूर समाचार :‌ शहरात १ सप्टेंबर २०२४ पासून २८ दिवस चालणा-या श्वानांच्या रेबिज लसीकरण मोहिमेची सुरूवात आज पासून होणार आहे. २८ दिवस चालणा-या या मोहिमेत नागपूर शहरातील २०,००० श्वानांना लसीकरण करण्याचे या संस्थांचे उद्दिष्ट आहे. एन.सी.आर.पी. च्या ‘Zero by 2030’ या मोठ्या ध्येया अंतर्गत शहरातील भटक्या श्वानांना मोफत रेबिज प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे.

‘#रेबिजमुक्त नागपूर’ या बॅनर खाली मिशन रेबिज व नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. निर्मिती पिपल्स ॲन्ड ॲनिमल वेलफेअर सोसायटी नागपूर एक समाजसेवी संस्था ऑन-ग्राऊंड मोहिमेचे नेतृत्व करणार आहे. या उपक्रमात नागपूर महाविद्यालयाचे विद्यार्थी व पशु-प्रेमींचा सहभाग राहणार आहे. शहरात भटक्या श्वानांचे जास्तीत-जास्त लसीकरण करण्यासाठी WVS, मिशन रेबिज व H.O.P.E. अशा संस्थांनी श्वान पकडणारी विशेष पथके एकत्रित केली आहेत. 

रेबिजचा प्रसार नियंत्रीत करण्यासाठी श्वानांची संख्या ज्या भागात जास्त आहे तिथे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यानुसार प्रभाग क्रमांक- १५, १६, १७, १८, १९, ३५, ३६, ३७ आणि ३८ मधे लसीकरण करण्यात येईल. त्यानंतर २७, २८, २९, ३०, ३१, ३२ आणि ३४ मधे लसीकरण करण्यात येईल.

रेबिज हा सार्वजनिक आरोग्याचा एक महत्वाचा प्रश्न आहे. २०१३ मधे गोवा मधे स्थापन करण्यात आलेले ‘मिशन रेबिज’ श्वानांमधील रेबिज निर्मुलनाच्या प्रयत्नांमधे आघाडीवर आहे. ‘मिशन रेबिज’ ही संस्था संशोधन चलित ‘One Health’ दृष्टिकोण वापरते, श्वानांच्या लसीकरण मोहिमेवर लक्ष केंद्रित करते तसेच सामाजिक शिक्षण आणि प्रभावी रेबिज नियंत्रण कार्यक्रम लागू करण्यासाठी सरकार आणि सेवाभावी संस्थांना समर्थन देते. भारतात ‘मिशन रेबिज’ संस्था गोवा सरकार आणि पशुसंवर्धन विभाग, मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिका, बंगरुळमधील बृहत बेंगलुर महानगरपालिका आणि केरळ च्या पशुसंवर्धन विभागासह अनेक राज्य सरकारे आणि महानगरपालिकांना तांत्रिक मार्गदर्शन करत आहे. याशिवाय त्यांनी पॉंडीचेरी आणि आसाम मधील पशुवैद्यकिय महाविद्यालयांना प्रयोगशाळा सहाय्य देऊ केले आहे.

रेबिज हा १०० टक्के टाळता येण्याजोगा आजार आहे, तरीही तो माणसांचा आणि प्राण्यांचा जिव घेत आहे. २०३० पर्यंत या धोक्याचे उच्चाटन करणे हे आमचे ध्येय आहे आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आमच्या चालू असलेल्या लसीकरण मोहिम महत्वाच्या आहेत, असे डॉ. शशिकांत जाधव, संचालक विशेष ऑपरेशन्स, WVS-मिशन रेबिज, म्हणाले.

#रेबिजमुक्त नागपूर मोहिम हे #RabiesFreeNagpur कार्यक्रमा अंतर्गत गोवा आणि मुंबई सारख्या प्रयत्नांशी जुळवून घेतलेल्या व्यापक ‘Zero by 2030’ या दिशेने आणखी एक पाऊल आहे. नागपूर शहरातील रहिवाश्यांना जन-जागृती करून आणि त्यांच्या समुदायांना रेबिज लसीकरणाच्या महत्वांबद्दल माहिती देऊन मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी प्रोत्साहीत केले जात आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क – डॉ. शशिकांत जाधव- ९७६३६८१४८९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *