मनपाच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर समाचार : मनपा शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी आपल्या सर्जनशीलतेला अन् सुप्त कलागुणांना वाव देत पर्यावरणपूरक असे गणपती “बाप्पा” शाडूच्या मातीने साकारले, त्यासोबतच यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीनेच साजरा करणार असल्याची ग्वाही दिली. नागपूर महानगरपालिकेद्वारे सोमवारी (ता:२) रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यशाळेत पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, पोलीस उपायुक्त श्री. निमित गोयल, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम, मनपाचे स्वच्छता ब्रँड ॲम्बेसेडर श्रीमती किरण मुंदडा, श्रीमती आंचल वर्मा, जिल्हाधिकारी यांच्या पत्नी डॉ. शालिनी इटनकर, पारंपरिक मूर्तीकार व प्रशिक्षक श्री. नाना मिसाळ, श्री. दीपक भगत, मनपा शाळेतील विद्यार्थी, कला शिक्षक, अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
विशेष म्हणजे, कार्यशाळेत उपस्थित सर्वांनी मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचा आनंद घेतला. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी स्वतःच्या हाताने गणरायाची सुंदर अशी मूर्ती साकारली, मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी देखील मातीपासून आकर्षक मूर्ती तयार केली व विद्यार्थ्यांना मूर्ती साकारल्यास मार्गदर्शन केले. डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सुध्दा माती पासुन मुर्ती तयार केली.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी म्हणाले की, पो.ओ.पीच्या मूर्ती या पर्यावरणासाठी घातक आहे. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी मातीच्या बनलेली गणपती मूर्तीची स्थापना करावी, आपण आमच्यासाठी स्वच्छेतेचे ब्रँड ॲम्बेसेडर आहात, आपण आपल्या घरी मातीच्याच गणपतीची स्थापना करावी, तसेच सार्वजनिक मंडळात बसविण्यात येणाऱ्या गणरायाची मूर्ती मातीच असावी असे आवाहन मनपा आयुक्तांनी विद्यार्थांना केले. याशिवाय डॉ. चौधरी यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व सांगितले.
यावेळी बोलतांना मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी सांगितले की, पीओपी मूर्तीवर असणाऱ्या कृत्रिम रंगा मुळे जलजीवन विस्कळीत होते. तसेच जल प्रदूषण देखील होते. पीओपी मूर्ती पाण्यात विरघळत नाही, परिणामी देवाच्या मूर्तीचा अनादर होतो. असे सांगत श्रीमती गोयल यांनी विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत शाडूच्या मातीने तयार केलेली गणपतीची मूर्ती घरी घेऊन जावी आणि त्याची स्थापना करावी असे आवाहन श्रीमती गोयल यांनी केले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक करीत उपायुक्त डॉ. गजेद्र महल्ले यांनी सांगितले की, मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पीओपीच्या मूर्तीची स्थापना करण्यावर बंदी आहे. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा याकरिता मनपा प्रयत्नशील आहे, मनपाद्वारे पीओपी मूर्ती विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मूर्तीविसर्जनासाठी मनपाद्वारे कृत्रिम टँकची व्यवस्था करण्यात येणार आहे. पीओपी मूर्तीना हद्दपार करण्याच्या अनुषंगाने मातीच्या मूर्ती पासून गणपती बनवण्याची कार्यशाळा आयोजित केली आहे. तर नागरिकांनी आपल्या घरी मातीच्याच मूर्तींची स्थापन करावी असे आवाहन डॉ. महल्ले यांनी यावेळी केले.
पर्यावरणाचा विचार करून मूर्ती बनवली जाते आहे, याचा एक कलाकार म्हणून मला आनंद झाला आहे. शाडूच्या मातीपासून गणपती बनवा आणि विसर्जनाच्या दिवशी त्या मातीत एक झाड लावा असे आवाहन प्रशिक्षक मूर्तिकार श्री. नाना मिसाळ यांनी केले.मनपाच्या कला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना याप्रसंगी सहकार्य केला.
कार्यशाळेत प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने शाडूच्या मातीपासून गणपती मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले, त्याचे अनुकरण करत विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेनुसार आकर्षक अशा मृर्ती तयार केल्या. याकरिता विद्यार्थांना शाडूची माती व कलाकृतीचे साहित्य प्रदान करण्यात आले होते. पोलीस आयुक्तांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
कार्यशाळेमध्ये मनपाच्या जयताळा मराठी माध्यम, शाळा, शिवणगाव मराठी माध्यम शाळा, विवेकानंद हिंदी माध्यम शाळा, एकात्मता नगर मराठी उच्च प्राथमिक शाळा, दुर्गानगर मराठी माध्यम शाळा, दत्तात्रय नगर मराठी माध्यम शाळा, ताजबाग उर्दू माध्यम शाळा, डॉ. आंबेडकर मराठी माध्यम शाळा, लालबहादुर शास्त्री हिंदी माध्यम शाळा, वाल्मिकी नगर हिंदी माध्यम शाळा, पेंशननगर उर्दू माध्यम शाळा, नेताजी मार्केट हिंदी माध्यम शाळा, डॉ. राममनोहर लोहिया माध्यमिक शाळा, पन्नालाल देवडीया हिंदी माध्यम शाळा, संजयनगर हिंदी माध्यम शाळा, कपिल नगर हिंदी माध्यम शाळा, एम.ए.के. आझाद उर्दू माध्यम शाळा, जी.एम. बनातवाला इंग्रजी माध्यम शाळा, हाजी अ.म. लीडर उर्दू माध्यम शाळा, कुंदनलाल गुप्ता माध्यम शाळा आणि गरीब नवाज उर्दू माध्यम शाळा या शाळांमधील विद्यार्थी सहभागी नोंदविला. यावेळी उत्कृष्ट मूर्ती साकारणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका श्रीमती मधू पराड यांनी केले. आभार शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम यांनी व्यक्त केले.