- Breaking News, विदर्भ

चंद्रपूर समाचार : कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्या सर्वशक्तीनिशी पूर्ण करणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

कंत्राटी कामगारांना चंद्रपूरच्या म्हाडामध्ये अल्प दरात घरे उपलब्ध करून देणार

चंद्रपूर समाचार : कामगार हा औद्योगिक क्षेत्रातील कणा असून त्यांचे प्रश्न सोडविणे हे आपले कर्तव्य आहे. महानिर्मिती मधील कंत्राटी कामगारांच्या वेतनात 19 टक्के वाढ मिळाल्याने कामगारांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. मात्र, कंत्राटी कामगारांच्या मागण्या बाकी आहे. त्या उर्वरित मागण्या भविष्यात सर्वशक्तीनिशी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तसेच चंद्रपूरच्या म्हाडामध्ये कंत्राटी कामगारांना अल्पदरात घरे उपलब्ध करून देणार असल्याचे ना.सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आयोजित विजयी जल्लोष सभेत ना. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी, महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष भाई भालाधरे, संयोजक नचिकेत मोरे, कार्याध्यक्ष बंडू हजारे,महानगराचे अध्यक्ष राहुल पावडे, भाजपा महामंत्री ब्रिजभुषण पाझारे,भाजपा महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, गणेश सपकाळे, सतीश तायडे, शंकर गडाख, प्रमोद कोलारकर, अमोल मेश्राम, वामन मराठे, वामन बुटले तसेच कंत्राटी कामगार संघटनेचे पदाधिकारी, तसेच मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.

कंत्राटी कामगारांनी आंदोलनाच्या यशानंतर मला निमंत्रित केले असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी सर्व संघटनांनी मिळून एकतेचा नारा दिला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत सह्याद्री येथे बैठक पार पडली. सर्व संघटनांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या संयमी भूमिका घेत योग्य पद्धतीने मांडल्या. 

सर्व संघटनेचे नेते एक विचाराने मागण्यांच्या संदर्भात तर्कसंगतीने विचार मांडत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्मचाऱ्यांच्या निर्णयाबाबत सकारात्मक भूमिका घेतली. आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये 19 टक्के पगारवाढीचा निर्णय घेतला.त्यामुळे आंदोलनाला यश प्राप्त झाले.कंत्राटी कामगारांच्या अद्यापही ज्या मागण्या अपूर्ण आहे. त्या सर्व मागण्या शक्तीनिशी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

विविध प्रश्न मार्गी

चंद्रपूर नगरपरिषदेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आणि 606 कर्मचारी स्थायी झाले. विधिमंडळात वनविभागातील वनमजुरांचा आवाज बुलंद करत त्यांच्यासाठी अधिसंख्य पदे निर्माण केली आणि 11 हजारपेक्षा जास्त वनमजूर स्थायी झाले.

ऑटो रिक्षावाल्यांचा व्यवसाय कराचा प्रश्न निर्माण झाला होता. स्वतःच कर्ज घेऊन व्यवसाय करणाऱ्यांच्या मागे व्यवसाय कर रद्द करण्याची भूमिका घेतली आणि ऑटो-रिक्षावाल्यांचे व्यवसाय कर रद्द करण्याचे कार्य केले.ऑटो रिक्षावाल्यांना पहिला घरकुलाचा टप्पा देत स्वतःच्या हक्काचे घर उपलब्ध करून दिले.

कामगारांना अल्पदरात घरे

चंद्रपूरच्या म्हाडामध्ये योजनेच्या माध्यमातून अल्पदरात घरे निर्माण करण्यात येत आहे. त्यांना स्वतःच्या हक्काचे घर नसेल अशा कंत्राटी कामगारांची यादी तयार करावी. या कंत्राटी कामगारांना अल्पदरात घरे उपलब्ध करून देणार असून घरकुलासाठी अडीच लाख रुपये अनुदान आहे. मात्र, केंद्र व राज्य शासनाच्या वतीने 2 लक्ष रुपये असे मिळून एकूण साडेचार लक्ष रुपये अनुदान उपलब्ध करून देणार असल्याचे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले. 

100 खाटाच्या ई.एस.आय.सी हॉस्पिटलला मान्यता

आरोग्याच्या संदर्भात, कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या रोजंदारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना ई.एस.आय.सी चा फायदा व्हावा याकरीता, केंद्र शासनाने अतिशय उत्तम तंत्रज्ञान असणारे 100 खाटाच्या ई.एस.आय.सी हॉस्पिटलला मान्यता दिली आहे. महाराष्ट्रात नसेल असे उत्तम व अत्याधुनिक हॉस्पिटल ई.एस.आय.सी चे होणार आहे. या रुग्णालयाचा फायदा कंत्राटी कर्मचाऱ्यांना निश्चितपणे होईल, असा विश्वास पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *