- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : विदर्भ स्तरीय भव्य ‘भजन रंग’ स्पर्धेत नवचैतन्य भजन मंडळ प्रथम

श्री सिद्धिविनायक देवस्थानमध्ये होणार पुरस्कार वितरण

नागपूर समाचार : गणेशोत्सवानिमित्त श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट, झिल्पी, मोहगांव च्या वतीने आयोजित विदर्भ स्तरीय भव्य ‘भजन रंग’ स्पर्धेमध्ये नवचैतन्य भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेत स्वरस्वारंगिणी भजन मंडळाने दुसरा तर नादब्रम्ह भजन मंडळाने तिसरा क्रमांक प्राप्त केला. यासह आठ मंडळांना उत्तेजनार्थ पुरस्कार देखील जाहीर करण्यात आले. सर्व विजेत्यांना रविवारी २२ सप्टेंबर रोजी श्री सिद्धिविनायक देवस्थान झिल्पी, मोहगांव येथे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. 

रविवारी १५ सप्टेंबर रोजी लक्ष्मीनगर आठ रस्ता चौक येथील सायंटिफिक सभागृहामध्ये सकाळी ८ वाजता ‘भजन रंग’ स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळी आवाहन श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष माजी महापौर श्री. संदीप जोशी, गजानन निशितकर, अनिरुद्ध भगत, सुमेध कुलकर्णी, नीरज दोंतुलवार आदी उपस्थित होते.

स्पर्धेमध्ये विदर्भातील वेगवेगळ्या भागातील ४५ भजन मंडळांनी सहभाग नोंदविला होता. ‘भजन रंग’ स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रसिद्ध गायक श्री गुणवंत घटवाई, प्रसिद्ध निवेदक श्री. किशोर घलांडे व ह.भ.प. श्री. दिगंबर बुवा नाईक यांनी जबाबदार पार पाडली. स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक श्री. प्रफुल्ल माटेगावकर यांनी केले. 

श्री गणेशोत्सवाच्या अनुषंगांने विदर्भातील भजन मंडळांना एक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उदात्त हेतूने श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट, झिल्पी, मोहगांव यांच्या वतीने ‘भजन रंग’ स्पर्धेच्या आयोजनाचा पुढाकार घेण्यात आला. आपली संस्कृती अबाधित ठेवण्यासाठी झटणाऱ्या विविध भागातील कलावतांच्या गुणांना वाव मिळावा हा या स्पर्धेचा उद्देश होता. 

रविवारी १५ सप्टेंबर रोजी लक्ष्मीनगर आठ रस्ता चौक येथील सायंटिफिक सभागृहामध्ये पार पडलेल्या स्पर्धेची सुरुवात नवचैतन्य भजन मंडळाच्या ‘अवघे गर्जे…’ या भजनाने झाली. त्यांच्या या सादरीकरणाला रसिक श्रोत्यांनी देखील उत्स्फूर्त दाद दिली. नवचैतन्य मंडळाच्या या सादरीकरणाला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले. दुसरा क्रमांक पटकविणाऱ्या स्वरस्वारंगिणी भजन मंडळाने ‘स्वप्नात आले…’ हे तर तिसऱ्या क्रमांकाच्या नादब्रम्ह भजन मंडळाने ‘जय विठ्ठल…’ हे भजन सादर केले. याशिवाय सारस्व भजन मंडळ, संत विश्वनाथ भजन मंडळ, नादब्रम्ह भजन मंडळ, स्वरा भजन मंडळ, रामकृष्णहरी भजन मंडळ, रामकृष्ण भजन मंडळ, ज्ञानेश्वरी भजन मंडळ आणि पसायदान भजन मंडळ या ८ मंडळांना उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर करण्यात आले. 

रविवारी २२ सप्टेंबर रोजी श्री सिद्धिविनायक देवस्थान झिल्पी, मोहगांव येथे विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात येईल. विदर्भ स्तरीय भव्य ‘भजन रंग’ स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या भजन मंडळाला ३१ हजार रुपये, द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या भजन मंडळाला २१ हजार रुपये आणि तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या भजन मंडळाला ११ हजार रुपये रोख पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय ५ हजार रुपयांची आठ उत्तेजनार्थ बक्षीसे देखील देण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *