* अधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निरसन
* शालेय विद्यार्थी झाले मनपाचे स्वच्छता योद्धा ब्रँड अँम्बेसेडर
नागपूर समाचार : स्वच्छतेची सुरुवात ही आपण स्वतःपासून करावी, घरी येणाऱ्या कचरा संकलन गाडीत घराचा कचरा ओला व सुका असा वर्गीकृत करून द्यावा, ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवा, ओला कचऱ्यापासून खताची निर्मिती होते, कचरा फक्त कचराकुंडीत टाका आपल्या शालेय परिसरात भवती लोक कचरा टाकत असतील तर, त्यांचे योग्य मार्गदर्शन करावे, स्वच्छते विषयी नागरिकांच्या मानसिकतेत एका दिवसात बदल योणार नाही, पण तो एक दिवस नक्की होईल, ही उत्तरे आहेत जिज्ञासू विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची, गुरुवारी (ता:१९ ) वनामती सभागृहात मनपा अधिकारी व शालेय विद्यार्थ्यांमध्ये “स्वच्छता संवाद” रंगला, यादरम्यान विद्यार्थ्यांना पडलेल्या अनेक प्रश्नांचे मनपा अधिकाऱ्यांनी तत्परतेने निरसन केले.
‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ या संकल्पनेस अनुसरून नागपूर महानगरपालिकेद्वारा “स्वच्छता ही सेवा ” अभियान उत्साहाने राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत गुरुवारी (ता: १९) व्हीआयपी रोड स्थित वनामती सभागृहात मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेत शालेय विद्यार्थी आणि मनपाच्या अधिकाऱ्यांमध्ये “स्वच्छता संवाद” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे, संपूर्ण कार्यक्रम झिरो वेस्ट संकल्पनेवर आधारित होता.कार्यक्रमात उपस्थीतांनी स्वच्छता शपथ घेतली.
कार्यक्रमात वनामतीच्या संचालिका वसुमना पंत, नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा-चांडक, मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, धरमपेठ झोनचे उपायुक्त प्रकाश वराडे, शिक्षणाधिकारी साधना सयाम यांच्यासह सहायक आयुक्त, सर्व झोनल अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमात मार्गदर्शन करीत मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी सांगितले की, नागपूर शहरातील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. नागपूर शहरातून १२ लाख किलो कचरा भांडेवाडी येथील डम्पिंग यार्ड येथे नेला जातो, येथे कचऱ्याचे डोंगर निर्माण होत आहेत, या कचऱ्याचे जर आपण आपल्या घरीच योग्य वर्गीकरण केले तर, भांडेवाडीत जमा होणारा कचऱ्याचे ढिगारे कमी करण्यात मदत होईल, शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांनी स्वच्छते कडे लक्ष दिले तर, पुढे चालून आपण नागपूरला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ शहर म्हणून नक्कीच नाव लौकिक मिळवून देऊ, असा विश्वास व्यक्त करीत आंचल गोयल यांनी विद्यार्थ्यांना घरच्या प्लास्टिक कचऱ्यापासून इकोबिक्सची निर्मिती करावी, स्वच्छता विषयी नागरिकांमध्ये जनजागृती करावी, आपण स्वच्छतेचे संदेश वाहन व्हावे असे आवाहन केले.
याशिवाय आंचल गोयल यांनी विद्यार्थ्यांना झिरो वेस्ट कार्यक्रमाची रूपरेषा समजावून सांगितली, तसेच आपणही कमीत कमी कचऱ्याची निर्मिती होईल याकरिता आपल्या घरी व शाळेत होणारे कार्यक्रम झिरो वेस्ट संकल्पनेद्वारे साजरे करावे असे आवाहन ही आंचल गोयल यांनी केले.
स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून करा: सौम्य शर्मा –चांडक
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्य शर्मा –चांडक यांनी स्वच्छतेची सुरुवात विद्यार्थ्यांनी स्वतःपासून करावी असे आवाहन केले, त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी आपल्याकडून कचरा होणार नाही याची दक्षता घ्यावी, घरी येणाऱ्या कचरा संकलन गाडीत ओला व सुका कचरा वेगवेगळा द्यावा, विद्युत कचरा (ई-वेस्ट)चे योग्य वर्गीकरण करावे, प्लास्टिक कचऱ्यापासून घरीच इकोब्रिक्सची निर्मिती करावी, आपल्या लहान प्रयत्नांचा पुढे चालून मोठा परिमाण नक्की दिसून येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
विद्यार्थी भविष्याचे सुजाण नागरिक: वसुमना पंत
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत वनामतीच्या संचालिका वसुमना पंत यांनी सांगितले की, विद्यार्थीचे मन, संस्कार व दिशा स्वच्छ असते, म्हणून त्यांनी केलेल्या आवाहनाला नागरिकांची उत्तम साद मिळते, सध्याचे विद्यार्थी भविष्यातील सुजाण नागरिक आहेत, विद्यार्थ्यांनी बदलाची सुरुवात स्वतःपासून करून इतरांना त्याबाबत जागृत करावे, आम्ही कचरा करणार नाही आणि इतर कचरा होऊ देणार नाही असा निश्चय विद्यार्थ्यांनी करावा, असे आवाहन पंत यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी स्वच्छ भारत मिशनच्या प्रथम पाच वर्षात नागपूर शहराला हागणदारीमुक्त शहर (ओडीएफ++) प्रवर्गात आणि वॅाटर + प्रवर्गात नामांकन प्राप्त असल्याचे सांगितले, तरी यंदाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विद्यार्थ्यांच्या योगदानाने शहराला कचरा मुक्त शहर करण्याचा मनपाचा प्रयत्न आहे असे सांगितले. यावेळी विद्यार्थिनी प्रियंका यादव, उमेदा झैनब आणि संस्कृती सुर्यवंशी यांनी स्वच्छता विषयी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले.
कार्यक्रमात स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर ही संकल्पना घराघरापर्यंत पोहोचावी या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शालेय विद्यार्थीना मनपाचे स्वच्छता योद्धा अर्थात स्वच्छता ब्रँड अँम्बेसेडर बनविण्यात आले. यात लालबहादूर शास्त्री मनपा शाळेचा विद्यार्थी प्रीतमकुमार राम, कपिल नगर हिंदी हायस्कूलची सबा अन्सारी, नेताजी मार्केट हिंदी हायस्कूलचे यमन साहू, जी एम बनतवाला हायस्कूलची उमेदा झैनब, गरीब नवाब उर्दू हायस्कूलचे अश्मीरा परवीन, डॉ. राम मनोहर लोहिया शाळेची संस्कृती सुर्यवंशी, वाल्मिकी नगर हिंदी माध्यमिक शाळेची प्रियांका राजेंद्र यादव, संजय नगर हिंदी माध्यमिक शाळेची कल्पना साहू, विवेकानंद नगर हिंदी माध्यमिक शाळेचा सचिन गंगा मुसराज, एम ए के आझाद उर्दू हायस्कूल अनम अफशीन, शिवणगाव हायस्कूलची परी इंगोले, दुर्गा नगर हिंदी माध्यमिक शाळेचा सोहम गायधने, जयताळा हायस्कूलची प्रिया रॉय, ताजाबाद उर्दू हायस्कूलची तबस्सुम हबीब खान, शहनाज फातिमा यांची स्वच्छता ब्रँड अँम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. हे विद्यार्थी आपल्या शाळेसह इतर परिसरातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व समजावून सांगणार आहेत.
स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार
नागपूर शहराला स्वच्छ सुंदर आणि स्वस्थ राखण्यासाठी दिवसरात्र कार्यरत सफाई कर्मचारी यांची प्रेरणादायी चित्रफित कार्यक्रमात दाखविण्यात आली, तसेच सफाई कर्मचारी नथू पाटील आणि संदीप सोमकुवर यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
माय पॉकेट, माय बीन
आपल्या आसपास स्वच्छता ठेवणे म्हणजे आपल्या भोवती कचरा न करणे व साफ सफाई ठेवणे. आपला परिसर स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. आजूबाजूला कचरा टाकणे अत्यंत वाईट सवय असून त्याने परिसरात अस्वच्छता पसरते, त्यामुळे माय पॉकेट, माय बीन समजून आपण खालेले चॉकलेट, वेफरचे पाकीट स्वतःच्या पॉकेट मध्ये ठेवावे, आणि तो कचरा नंतर कचरा कुंडीत टाकावा असे आवाहन अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी केले.