- Breaking News, Meeting, नागपुर समाचार

नागपूर समाचार : जोखीम घेवून काम करणाऱ्या वीज निर्मिती कंत्राटी कामगारांना खाजगी रुग्णालयात मोफत उपचार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर समाचार : राज्य सरकार संवेदनशीलपणे कार्य करीत असून समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे. वीज निर्मिती कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांवरही सकारात्मक निर्णय घेण्यात आले. जोखीम घेवून काम करणाऱ्या वीजनिर्मिती कंत्राटी कामगारांना मेडीक्लेम अंतर्गत राज्यातील उत्तमोत्तम खाजगी रुग्णालयात मोफत उपचार देण्याची व्यवस्था तयार करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. 

मूळ वेतनात १९ टक्के वाढ, ५ लाख मेडिक्लेम, ६० वर्ष रोजगाराच्या हमीसह महत्वाच्या सहा मागण्या मान्य केल्याबद्दल वीज निर्मिती कंत्राटी कामगार संयुक्त कृती समीती खापरखेडा व कोराडी यांच्यावतीने दहेगाव येथील रामदरबार मंदिर परिसरात आयोजित कामगार मेळावा व सत्कार समारंभात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. आमदार चंद्रशेखर बावनकुळे, माजी आमदार सर्वश्री मल्लीकार्जुन रेड्डी, सुधाकर कोहळे, वीज निर्मिती कंत्राटी कामगार संयुक्त कृती समीतीचे अध्यक्ष चंद्रदास भालादरे, संयोजक नचिकेत मोरे आदी यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, कंत्राटी कामगारांसाठी निर्णय घेवून केलेल्या कर्तव्यपूर्तीबाबत कृतज्ञता म्हणून आज सत्कार होत असल्याचा मनापासून आनंद आहे. अंगणवाडी सेविका, आशा सेविका, कोतवाल, कंत्राटी कामगार आदींच्या मानधनात राज्य शासनाने वाढ केली. नियमित कामगारांप्रमाणे कंत्राटी कामगारांना १९ टक्के वेतनवाढ करण्याचा निर्णय घेतला. मेडीक्लेमचा निर्णय घेण्यात आला असून यात बदल करण्याची मागणी पूर्ण करून राज्यातील उत्तमोत्तम खाजगी रुग्णालयात मोफत उपचार देण्याची व्यवस्था तयार करण्यात येईल, असे ते म्हणाले. कंत्राटी कामगारांना नियमित भरतीमध्ये 10 गुण देण्याचा निर्णय, कामगारांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याचा निर्णय, कंत्राटदाराच्या नावाच्या गेटपास ऐवजी कंत्राटी कामगारांच्या गेटपासवर महानिर्मिती व महावितरणचा शिक्का देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

ई-श्रम पोर्टलच्या माध्यमातून कंत्राटी व असंघटीत कामगारांची नोंदणी करण्यात आली असून ३४ मंडळ तयार करण्यात आले आहेत. या मंडळांच्या माध्यमातून त्यांच्या हिताच्या योजना थेट पुरवून त्यांना सामाजिक स्थेर्य देण्याच्या दृष्टीने कार्य सुरु असल्याचेही ते म्हणाले. कंत्राटी कामगारांच्या बँक खात्यात पैसे देण्याचा निर्णय झाला. मात्र, काही ठिकाणी कंत्राटदार हे कामगारांचे एटीएम कार्ड स्वतः जवळ ठेवत असल्याचे प्रकरणे पुढे येत आहेत. अशा कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

राज्य शासनाने महिलांसाठी महत्वाचे निर्णय घेतल्याचे सांगत विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून राज्यातील १ कोटी महिलांना लखपतीदीदी करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. एसटीमध्ये महिलांना अर्धे तिकीट केले, त्याने तोट्यात असलेली एसटी नफ्यात आली. राज्यातील मुलींना उच्च शिक्षण मोफत केले आहे. ‘मुख्यमंत्री- माझी लाकडी बहीण’ योजनेतून १ कोटी ६० लाख महिलांच्या बँक खात्यात आर्थिक लाभ दिला आहे. पुढील महिन्यापर्यंत अडीच कोटी महिलांना या योजेअंतर्गत आर्थिक लाभ देणार असून ही योजना बंद होवू देणार नाही. या योजनेसाठी दलित निधीचे पैसे वळविले नसल्याचे सांगत या संदर्भातील आरोप निराधार असल्याचेही ते म्हणाले. 

आमदार चंद्रशेखर बावनकुळे, कामगार संयुक्त कृती समीतीचे अध्यक्ष चंद्रदास भालादरे, संयोजन नचिकेत मोरे यांनी यावेळी उपस्थितांना मागदर्शन केले. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपोषणकर्ते वीज निर्मिती कंत्राटी कामगार सतीश तायडे यांना गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *