- Breaking News, आयोजन, नागपुर समाचार, मनपा

नागपूर समाचार : मनपातर्फे २२ सप्टेंबर रोजी “स्वच्छता दौड”

अतिरिक्त आयुक्त गोयल यांच्या हस्ते “स्वच्छता दौड” च्या टी-शर्टचे अनावरण :मोठ्या संख्येत सहभागी होण्याचे आवाहन

नागपूर समाचार : ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ या संकल्पनेस अनुसरून केंद्र सरकारच्या “स्वच्छता ही सेवा २०२४’ अभियांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मनपा मुख्यालय सिव्हिल लाईन्स येथे रविवार २२ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता “स्वच्छता दौड” चे आयोजन करण्यात येत आहे. मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या हस्ते “स्वच्छता दौड” च्या टी-शर्टचे अनावरण करण्यात आले.

गुरुवारी (ता:२२) मनपा मुख्यालयातील अतिरिक्त आयुक्त सभा कक्षात आयोजित छोटेखानी समारंभात घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी युवा पिढीला भुरळ घालणाऱ्या इन्स्टाग्राम, रिल्स, फेसबुक पेज, रेडिओ जॉकिज असे सोशल मीडियावर प्रभुत्व असलेल्या इन्फ्लुएंसर यांची बैठक घेत, आपल्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांना स्वच्छतेचा संदेश जावा असे आवाहन केले. यावेळी शहरातील जवळपास ३५ इन्फ्लुएंसर उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल म्हणाल्या की, कचरामुक्त शहर या संकल्पनेला व्यापक रूप देण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. प्रत्येक नागरिकांच्या मनात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण व्हावी आणि स्वच्छतेसाठी युवकांसह नागरिकांनी पुढाकार घ्यावा, या हेतूने केंद्रीय गृह निर्माण तथा शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा 2024’ अभियान राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत नानाविध उपक्रम राबविण्यात येणार असून, याद्वारे नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात येणार आहे. तरी या शहर स्वच्छता मोहिमेत नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदवीत आपल्या नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *