आयुक्त डॉ. चौधरी यांनी आरपीटीएस परिसरातून केली उपक्रमाची सुरुवात
नागपूर समाचार : केंद्रीय गृह निर्माण तथा शहरी कार्य मंत्रालयाच्या स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ या संकल्पनेस अनुसरून राबविण्यात येणाऱ्या ‘स्वच्छता ही सेवा 2024’ या अभियानातील “एक पेड माँ के नाम” या उपक्रमाची आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे वृक्षारोपण करीत सुरुवात केली. मनपातर्फे दहाही झोन निहाय विविध सहा ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे हबिल्ड संस्था, आर.संदेश व रीनोव्हेटीओ फाउंडेशन यांच्या सहकार्याने “एक पेड माँ के नाम” उपक्रम घेण्यात आला, उपक्रमांतर्गत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे, उपक्रमाद्वारे शहरातील विविध ठिकाणी मोठया संख्येत वृक्ष लावण्याचा मनपाचा मानस आहे.
याप्रसंगी पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूरचे उपप्राचार्य प्रशांत कुलकर्णी, मनपाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, प्रसिद्ध योगगुरु सौरभ बोथरा, आर संदेशचे सर्वश्री रामदेव अग्रवाल, दीपक अग्रवाल, संदेश अग्रवाल, डॉ.नितीन अग्रवाल, रिंकू अग्रवाल, नकुल अग्रवाल यांच्यासह व्ही एम व्ही महाविद्यालयाच्या ग्रीन क्लबचे स्वयंसेवक प्रामुख्याने, पोलीस अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करीत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, आपल्या वडिलधा-यांच्या सन्मानार्थ झाड लावण्याची आपली परंपरा आहे. त्यासअनुसरून केंद्र शासनाच्या ‘स्वच्छता ही सेवा अंतर्गत “एक पेड माँ के नाम” लावण्यात येत आहे. मनपाद्वारे वर्धा रोड येथील ऑफिसर्स मेस एयर फोर्स, आरपीटीएस रोड लक्ष्मी नगर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र, दाभा परिसर, मनीष नगर सिमेंट रोड व भांडेवाडी येथे वृक्षारोपण करण्यात आले आहे. नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर हरित शहर म्हणून साकारण्यासाठी उपक्रम महत्वाचा असून, नागरिकांनी देखील उपक्रमात सहभाग नोंदवीत वृक्षारोपण करावे असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
मनपाद्वारे शहरात पशूपक्ष्यांचा अधिवास वाढेल अशा वृक्षरोपांची लागवड करण्यात येत आहे. “एक पेड माँ के नाम” या उपक्रमाअंतर्गत जांभूळ, वड, पिंपळ, आंबा, आवळा, पेरू, चिक्कू, आदी रोपांचे वृक्षारोपण करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी यांनी केले.