नागपूर समाचार : अलीकडच्या काळात जंगलाशेजारील गावात वाघांचा व जंगली प्राण्यांचा वावर वाढल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. नागपूर जिल्ह्यातील रामटेक व इतर वनक्षेत्रात जंगलात चरायला गेलेल्या पाळीव जनावरांसह गुराखी, शेतकरी, आदिवासी यांच्यावर हल्ले झाले आहेत. हे लक्षात घेता जंगलाचे असलेले क्षेत्र व या क्षेत्रात वाघांची नेमकी असलेली संख्या ही तपासून घेतली पाहिजे. जर संख्या अधिक झाली असेल तर तेथील वाघांना इतर ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले.
नागपूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्थानिक लोकांवर वाघांच्या होत असलेल्या हल्ल्यांचे प्रमाण पाहता त्यावर उपाय योजना करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात सांस्कृतिक व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस आमदार आशिष जयस्वाल, प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता बिस्वास, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, वन विभागातील वरिष्ठ अधिकारी विवेक खांडेकर, डॉ. प्रभुनाथ शुक्ल, माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी आदी उपस्थित होते.
वनक्षेत्रात मोडणारी गावे व वनक्षेत्राच्या शेजारी असलेली गावे यांच्या सुरक्षिततेसाठी वन विभागासमवेत स्थानिक लोकप्रतिनिधीच्या सहभाग असलेल्या समित्यांची भूमिका अधिक महत्वाची आहे. जी गावे वनक्षेत्रात आहेत त्या गावांना चेन लिंक फेन्सिंग कशा पध्दतीने करता येईल हे तपासून घेतले जाईल. यात जिल्हा वार्षिक योजना, आदिवासी विभाग, वन विभाग आणि सीएसआर फंडच्या माध्यमातून प्रायोगिक पातळीवर एखाद्या गावाचे नियोजन करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. काही ठिकाणी वाघांना निटशी शिकार करण्याचे कसब नसल्याने केवळ ते मानवी हल्ल्याकडे वळल्याच्या तक्रारीची त्यांनी गंभीर दखल घेतली. अशा वाघांची खात्री करुन त्यांना जेरबंद करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. हे वाघ खुल्या जंगलापेक्षा गोरेवाडा सफारी येथे स्थलांतरीत करण्यास त्यांनी सांगितले.
वनक्षेत्रात असलेल्या प्रत्येक गावांमध्ये स्थानिक युवकांची निवड करुन प्राथमिक प्रतिसाद दलाबाबत विचार करण्यास त्यांनी सांगितले. या युवकांना स्वसंरक्षणासह आपातकालिन परिस्थितीत गावकऱ्यांची मदत करता यावी अशा प्रकारचे प्रशिक्षण त्यांना देता येईल याच बरोबर शॉक स्टिक, टॉर्च, इतर अत्यावश्यक सुविधा देऊन त्यांना मानधन तत्वावर नियुक्त कसे करता येईल हे पडताळून त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यास वनमंत्री मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
या उपाययोजनांसह अलीकडच्या काळात एआयच्या माध्यमातून याबाबत प्रयोग करुन पाहता येतील. यात प्रामुख्याने गावाच्या सीमेत वाघ शिरल्यास आलार्म, सायरन, गावातील लोकांच्या मोबाईलवर एसएमएस संदेश पोहचविणे शक्य आहे. याबाबत भारतीय सैन्यदल व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून तंत्रज्ञानाची शक्याअशक्यता पडताळून घेण्याचे त्यांनी सांगितले. वाघाच्या हल्ल्यात पाळीव गाई व जनावरांचे जे जीव जातात त्याचे पंचनामे करण्यासाठी वन कर्मचाऱ्यांनी जर कसूर केला तर त्यांच्या विरुध्द कठोर कारवाईचे निर्देशही त्यांनी दिले.