- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : नागपूर येथील राष्ट्रीय लोक अदलातमध्ये तब्बल ४८ हजार प्रकरणे निकाली

एकूण समझोता रक्कम १ अब्ज ३ कोटी रूपये

घटस्फोट व कौटुंबिक वाद प्रकरणांतील २३ जोडप्यांमध्ये आपसी समझोता; पुन्हा नव्याने सुखाचा संसार सुरू

५० कोटी ५१ लक्ष रुपयांची कर्ज वसूली रक्कम

मोटार अपघात दाव्यांमध्ये नुकसान भरपाई रक्कम ८ कोटी ४० लक्ष

७२० ट्रॅफिक ई-चालान प्रकरणे निकाली

नागपूर समाचार : जिल्हयात आज दिनांक २८ रोजी आयोजीत राष्ट्रीय लोक अदालतीस नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोक अदालतीमध्ये २५,३७३ प्रलंबित प्रकरणे व ८९,१६२ दाखलपुर्व प्रकरणांचा समावेश होता. त्यापैकी ४,०४८ प्रलंबित प्रकरणे व ४४,८१७ दाखलपुर्व अशी एकूण ४८,८६५ प्रकरणे आपसात तडजोडीने मिटली. संबंधीत पक्षकारांना एकूण १ अब्ज ३ कोटी रूपये समझोता रक्कमेचा लाभ मिळाल्याची माहिती न्यायाधीश सचिन स. पाटील, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधीकरण, नागपूर यांनी दिली. 

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधीकरण डी.पी. सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २८ रोजी जिल्हा न्यायालय, नागपूर, कौटुंबिक न्यायालय, कर्ज वसूली न्यायाधीकरण, सहकार न्यायालय, औद्योगिक व कामगार न्यायालय आणि नागपूर जिल्हयातील सर्व तालूका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दिवाणी दावे, भुसंपादन प्रकरणे, तडजोडीयोग्य फौजदारी प्रकरणे, वैवाहिक वाद, मोटार अपघात दावे, विद्युत अधिनियमाची प्रकरणे, पराकम्य लेख अधिनियम कलम १३८ ची प्रकरणे, कामगार वाद, रक्कम वसुली प्रकरणे, ट्रॅफिक ई-चालान प्रकरणे आणि इतर दाखलपूर्व प्रकरणे समोपचाराने निपटारा करण्यासाठी ठेवण्यात आली. त्यास हजारो नागरिकांनी व पक्षकारांनी सहभाग नोंदवून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. 

नागपूर जिल्हयातील सर्व फौजदारी न्यायालयांमध्ये विशेष अभियान राबवून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम २५६ व २५८ अंतर्गत एकूण ४,९६५ प्रलंबित फौजदारी प्रकरणे देखील निकाली काढण्यात आली. विशेष बाब म्हणजे या लोक अदालतीचे माध्यमातून २३ घटस्फोट व कौटुंबिक वाद प्रकरणांतील जोडप्यांमध्ये आपसी समझोत्याने मनोमिलन होऊन ते एकत्रित राहण्यास गेले. तसेच याव्यतिरिक्त ७२० ट्रॅफिक ई-चालान प्रकरणे देखील समझोत्याने निकाली काढण्यात आली.

नागपूर जिल्हयामध्ये प्रलंबित प्रकरणे व दावा दाखलपुर्व प्रकरणे हाताळण्याकरीता एकूण ४९ पॅनल तयार करण्यात आले. त्या पॅनलमध्ये सध्या कार्यरत असलेले व सेवानिवृत्त न्यायिक अधिकारी, वकील व समाजसेवक यांचा समावेश करण्यात आला होता. मा. श्री. डी. पी. सुराणा साहेब, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, मा. श्रीमती एम. व्ही. देशपांडे, जिल्हा न्यायाधीश १ आणि श्री. सचिन स. पाटील, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूर यांनी पक्षकारांना त्यांचे वाद मिटविण्याकरीता प्रोत्साहित केले.

२३ जोडप्यांमध्ये आपसी समझोत्याने मनोमिलन होऊन पुन्हा नव्याने सुखाचा संसार सुरू

हिंदु विवाह कायदा, १९५५ नुसार घटस्फोट मिळण्यासाठी एका पतीने त्याचे पत्नीविरुध्द मॅरेज पिटीशन क. २८६/२०२३ प्रकरण न्यायालयात दाखल केले होते. सन २०१९ मध्ये विवाह झालेल्या त्या जोडप्यास विवाह संबंधातून एक अपत्य झाले. परंतु मुलीच्या जन्मानंतर त्यांच्यामध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद होवू लागले. त्यावरुन पत्नीने पतीविरुध्द पोलीस ठाणे, कामठी येथे तकार देखील तिचेविरुध्द दाखल केली होती. त्यानंतर पतीने घटस्फोट मिळण्यासाठी न्यायालयात ते प्रकरण दाखल केले होते. ते प्रकरण पॅनल कमांक ७ येथील पॅनल प्रमुख श्री. एस.ए. गवई साहेब यांच पॅनलसमोर तडजोडी करिता ठेवण्यात आले. लोक अदालत पॅनलने त्या जोडप्यामध्ये तडजोडीची यशस्वी चर्चा घडवून आणली व त्यांचे मध्ये आपसी समझोत्याने मनोमिलन होऊन मुलीच्या भविष्याचा विचार करुन ते एकत्र नांदायला गेले.

अशाच प्रकारच्या घटस्फोटाच्या उंबरठ्यावर असलेल्या एकूण २३ जोडप्यांमध्ये लोक अदालतीमध्ये तडजोडीची यशस्वी चर्चा घडवून आणून त्यांच्यामध्ये आपसी समझोत्याने मनोमिलन झाले आणि त्यांनी पुन्हा नव्याने सुखाचा संसार सुरू केला.

कर्ज वसूली रक्कम ५० कोटी ५१ लक्ष रुपये

कर्ज वसूली न्यायाधीकरण, नागपूर यांच्या समोरील ७५ प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी ५९ प्रकरणांमध्ये तडजोड होवून संबंधीत बँका व वित्तीय संस्था यांची ४४ कोटी रूपये कर्जाची वसूली झाली. तसेच जिल्हा व तालुका न्यायालयातील प्रलंबीत व दाखलपूर्व बँक व वित्तीय संस्थाच्या प्रकरणामध्ये देखील कोट्यावधी रूपयांची कर्ज वसूली प्रकरणे निकाली निघाली. अशा सर्व कर्जवसूली प्रकरणांमधील एकूण रक्कम ५०,५१,७४,८२० रूपये एवढी आहे.

मोटार अपघातग्रस्त व्यक्तींना व मृतकांच्या वारसांना एकूण ८ कोटी ४० लक्ष रूपये नुकसान भरपाई

मोटार अपघात दावा न्यायाधीकरण, नागपूर यांचे कडील १२२ दाव्यांमध्ये तडजोड होवून अपघातग्रस्त व्यक्तींना व मृतांच्या वारसांना ८ कोटी ४० लक्ष रूपये नुकसान भरपाई रक्कम मिळाली.

दिनांक २५/११/२०१८ रोजी कार अपघातामध्ये व्यवसायाने शिक्षक असलेल्या विवेक श्रीधर काळे यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांचे वारसांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी मोटार अपघात दावा न्यायाधिकरण, नागपूर येथे मोटार अपघात दावा क्र.५९७/२०२१ (वंदना काळे व इतर विरुध्द एच.डी.एफ. सी. एर्गो जनरल इंश्युरंस कंपनी लिमीटेड) हे प्रकरण दाखल केले होते. लोक अदालतमध्ये अर्जदार व गैरअर्जदार यांच्यामध्ये आपसी समझोता होवून मयताचे वारसांना ६८ लक्ष रूपये नुकसान भरपाई मिळाली.

तसेच दिनांक ०६/०८/२०२३ रोजी नागपूर ते उमरेड रस्त्यावर दिनेश पुंडे यांचा कारने धडक दिल्याने अपघात होवून मृत्यू झाला. त्यामुळे त्यांची पत्नी नामे दिव्या पुंडे हिने मोटार अपघात दावा न्यायाधिकरण, नागपूर येथे नुकसान भरपाई मिळण्यासाठी मोटार अपघात दावा क्र.८९०/२०२३ (दिव्या पुंडेविरुध्द बजाज इंश्युरंसकंपनी लिमीटेड) हे प्रकरण दाखल केले होते. त्या प्रकरणात अर्जदार व गैरअर्जदार इंश्युरंस कंपनीमध्ये पॅनल क.१ समोर तडजोडीची यशस्वी बोलणी होवून इंश्युरन्स कंपनीने अर्जदार हिला रुपये ५० लक्ष नुकसान भरपाई दिली.

१० वर्ष जुन्या १९ भू-संपादनच्या प्रकरणांमध्ये तडजोड

शासनाने १० वर्षांपुर्वी संपादित केलेल्या जमीनींचा मोबदला मिळण्यासाठी अर्जदार रामदेव कवडसे, जनार्दन दौलत ढोणे, मैनाबाई वैद्य व इतरांनी कार्यकारी अभियंता व इतर यांचेविरुध्द विशेष भुसंपादन न्यायालय, नागपूर येथे दाखल केलेली प्रकरणे पॅनल क.२ येथील पॅनल प्रमुख न्यायाधीश श्री. ए. आर. सुर्वे यांचेसमोर तडजोडीकरिता लोक न्यायालयामध्ये ठेवण्यात आली. त्यापैकी १९ प्रकरणांमध्ये तडजोड होवून अर्जदारांना व्याजासह जमीनींचा लाखो रुपयांचा मोबदला मिळाला.

दिवाणी प्रकरणामध्ये ५ कोटी २० लक्ष रूपयांची तडतोड

मौजा परसोडी, तह. नागपूर (ग्रामीण), जि. नागपूर येथील जमीनीबाबतच्या कराराचे अनुपालन करण्यासाठी वादीने दिवाणी न्यायालय, नागपूर या न्यायालयात विशेष दिवाणी दावा क.४३१/२०२३ (हिमालया इंफा प्रोजेक्ट विरूध्द राधीकाबाई देऊळकर व इतर) दाखल केला होता. हे प्रकरण पॅनल कमांक १२ येथील पॅनल प्रमुख दिवाणी न्यायाधीश श्री. ए.एस. मुंडे यांचे पॅनल समोर तडजोडीसाठी ठेवण्यात आले. दोन्ही पक्षांमध्ये तडजोडीची यशस्वी चर्चा घडवून ते प्रकरण सामोपचाराने निकाली काढण्यात आले. सदर प्रकरणातील समझोता रक्कम ही ५ कोटी २० लक्ष रुपये अशी होती.

२१ वर्ष जुना फौजदारी खटला तडजोडीने निकाली

फियादी राहुल दत्तात्राय बुचे यांनी सन २००३ मध्ये सदर पोलीस ठाणे, नागपूर येथे चोरीबाबत दाखल केलेल्या फिर्यादीवरुन आरोपी नरेश भाडजिया विरुध्द नियमित फौजदारी खटला क. ४८/२००३ हा फौजदारी खटला मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, नागपूर या न्यायालयात प्रलंबीत होता. सदर २१वर्ष जुन्या फौजदारी खटल्यामध्ये तडजोड होवून तो खटला लोक न्यायालयामध्ये निकाली काढण्यात आला.

धनादेश अनादराचे ८ वर्ष जुन्या फौजदारी खटल्यामध्ये २५ लक्ष रूपयांची तडजोड

आरोपीने फिर्यादीला २५ लक्ष रूपयांचा दिलेला धनादेश न वटल्याने परकाम्य संलेख अधिनियम, १८८१ चे कलम १३८ नुसार दाखल केलेला संकीर्ण फौजदारी खटला क. १४०४७/२०१६ (अदिती जैन विरूध्द वनिता इंटरप्रायजेस) हा खटला मा. श्री. एस. एस. मुंडे यांचे पॅनल कमांक १२ समोर तडजोडीसाठी ठेवण्यात आला. सदर फौजदारी खटल्यामध्ये फिर्यादी व आरोपीमध्ये तडजोड होवून आरोपीने फिर्यादीला समझोता रक्कम दिली व प्रकरण तडजोडीने निकाली निघाले.

आरबीदेशन दरखास्त प्रकरणामध्ये ३४ लक्ष ८९ हजार रुपयांची तडजोड

नागपूर जिल्हा न्यायालयासमोर लवाद निवाडयाच्या आदेशाचे अंमलबजावणी बाबत आरबीट्रेशन दरखास्त कमांक ४८१/२०२४ (वरठाना फायनान्स प्रा. लि. विरूध्द भंसाली ज्युनीयर कॉलेज) हे प्रकरण प्रलंबित होते. पॅनल कमांक ७ चे प्रमुख न्यायाधीश श्री. एस.ए. गवई यांच्यासमक्ष दोन्ही पक्षकारांमध्ये तडजोडीची यशस्वी बोलणी होवून ३४,८९,९५२/- रुपयांचे समझोता रक्कमेवर ते प्रकरण निकाली निघाले.

७२० ट्रॅफिक ई-चालान प्रकरणे निकाली

नागपूर रस्ता वाहतुक विभागाची दाखलपूर्व ट्रॅफिक ई-चालान प्रकरणे देखील लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती व त्यापैकी ७२० प्रकरणांमध्ये वाहन धारकांनी एकूण ४,३६,५५०/- रूपये दंड रक्कम जमा केली व ती प्रकरणे निकाली काढण्यात आली.मा. श्री. डी. पी. सुराणा साहेब, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायाधीश श्रीमती एम.व्ही. देशपांडे, श्री.पी.आर. कदम, श्री. सचिन स. पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूर, सर्व न्यायिक अधिकारी, पॅनल सदस्य, न्यायालयीन कर्मचारी, विधी स्वयंसेवक, जिल्हा न्यायालयीन कर्मचारी वर्ग आणि जिल्हा विधी सेवा प्राधिक. रणाचे कर्मचारी यांनी लोकअदालत यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता अथक परिश्रम घेतले. नागपूर जिल्हयातील विधीज्ञांनी देखील लोकअदालत यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. तसेच विविध विधी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी देखील लोकअदालतच्या कामकाजाचे अवलोकन केले. मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.डी.पी.सुराणा, श्रीमती एम. व्ही. देशपांडे आणि श्री. सचिन स. पाटील सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूर यांनी लोक अदालतीचा लाभ घेणाऱ्या सर्व पक्षकारांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *