- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपूर समाचार : ज्येष्ठ नागरिकांकरिता कार्यरत संस्थांचा मनपाद्वारे सत्कार

नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे मंगळवारी १ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिक दिनाच्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत नागपूर शहरातील संस्थांचा सत्कार करण्यात आला. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी संघटनांच्या प्रतिनिधींना सन्मानचिन्ह आणि तुळशीरोप प्रदान करून सन्मानित केले. यावेळी सहायक अधीक्षक सुरेंद्र सरदारे, विद्युत सहायक अभियांत्रिकी चंद्रशेखर पाचोरे, नूतन मोरे आदी उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिक दिनी ज्येष्ठ नागरिकांकरिता नागपूर शहरातील कार्यरत संस्थांचा सत्कार करण्याकरिता मनपाद्वारे संस्थांकडून वर्षभराचा कार्यअहवाल मागविण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी (१ ऑक्टोबर) मनपामध्ये १४ संस्थांनी उपस्थिती दर्शविली. नागपूर महानगरपालिकेद्वारे ज्येष्ठ नागरिक मंडळ, ज्येष्ठ नागरिक मंडळ पतंजली योग समिती, सीजीएचएस लाभार्थी कल्याण संघ ऑफ इंडिया, विदर्भ ज्येष्ठ कलाकार संघ, विवेक बहुजन हिताय कल्याणकारी संस्था, सीनिअर सिटीझन कौंसिल ऑफ नागपूर डिस्ट्रिक्ट, ज्येष्ठ नागरिक मंडळ गोरले लेआउट, सुयोगनगर सीनिअर सिटीझन योगा ग्रुप, सर्व मानव सेवा संघ, ज्येष्ठ नागरिक समस्या निवारण समिती, फेसकॉम श्रीकृष्ण ज्येष्ठ नागरिक मंडळ, ज्येष्ठ नागरिक सेल या संघटनांच्या प्रतिनिधींना कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी ज्येष्ठ नागरिकांना शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेद्वारे सलग दुस-या वर्षी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. येणा-या काळात मोठ्या स्वरूपात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नागपूर महानगरपालिकेद्वारे ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी ज्येष्ठ नागरिक कक्ष सुरू करण्यात आले आहे. याशिवाय मनपाद्वारे निवारा केंद्र, उद्यानांमध्ये विरंगुळा केंद्र देखील सुरू करण्यात आले आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी देखील ज्येष्ठ नागरिकांसोबत बैठक घेउन चर्चा केली.

केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा सर्व ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी नागपूर महानगरपालिका प्रत्नरत आहे. वयोश्री योजनेकरिता आतापर्यंत १८०० पेक्षा जास्त तर मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेकरिता ५०० पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांना या योजनांचा लाभ मिळावा याकरिता ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत संस्थांनी देखील पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी केले.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचविणे यासोबतच ज्येष्ठ नागरिकांकरिता करावयाच्या कार्यासंदर्भात मनपाद्वारे कार्यक्रमात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात सर्वश्री हुकुमचंद मिश्रीकोटकर, काशिनाथ धांडे, वसंत कळंबे, वासुदेव वाकोडीकर, सुरेश धामणकर, सुनीता मेश्राम, डी.एन. सवाईथुल, ॲड. मोरेश्वर उपासे, नत्थुजी हुके, सुरेश रेवतकर, सुरेश मौर्य, मधुकर पाठक, अब्दुल गफ्फार शेख यांनी सहभाग नोंदवून आपल्या सूचना मांडल्या.

कार्यक्रमाचे संचालन शारदा भुसारी यांनी केले तर आभार नूतन मोरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *