माहिती आयोगाच्या नागपूर खंडपिठात ऑनलाईन सुनावणी प्रणालीचे उद्घाटन
नागपूर समाचार : ऑनलाईन सुनावणी प्रणाली ही सुदूर भागातील नागरिकांना तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना सुनावणीसाठी सोयीची ठरणार असून जलद न्याय प्रक्रियेसाठीही उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाच्या वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी आज येथे केले.
सिव्हिल लाईन परिसरातील राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपिठाच्या ऑनलाईन सुनावणी प्रणालीचे उद्घाटन न्या. डांगरे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. माहिती आयोगाच्या नागपूर खंडपिठाचे आयुक्त राहुल पांडे, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिना, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, महामेट्रोचे संचालक अनिल कोकाटे मंचावर उपस्थित होते.
न्या. डांगरे म्हणाल्या, कोरोनाच्या जागतिक महामारीनंतर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध क्षेत्रात सुसूत्रता व सुविधा प्रदान झाल्याचे चित्र आहे. माहिती आयोगाच्या नागपूर खंडपिठात ऑनलाईन सुनावणी प्रणालीमुळे या खंडपिठाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या वेळेची व पैशांची बचत होणार आहे. त्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टिने न्याय प्रक्रियेला ही ऑनलाईन प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. सामान्य व्यक्तींसह सरकारी कर्मचाऱ्यांनाही विविध न्यायालये, न्यायाधिकरणांसमोर सादर होता येणार असून त्यांना न्याय मिळविण्यासाठी ही प्रणाली सोयीची ठरले. या प्रणालीचा योग्यप्रकारे वापर होऊन उपयुक्ततेची मानके जपण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी प्रास्ताविकात सांगितले, गेल्या तीन वर्षात राज्य माहिती आयोगाच्या नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर या खंडपिठांद्वारे 26 हजार 775 द्वितीय अपीले व तक्रारींचा निपटारा करण्यात आला. माहिती अधिकार कायद्याचा अधिकाधिक उपयोग केल्यास सामान्याला न्याय मिळेल. तसेच प्रशासनाला आणखी जबाबदारीने काम करण्यासाठी बळ मिळेल. अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
मुख्य शासकीय अधिवक्ता देवेंद्र चव्हाण,ज्येष्ठ संपादक सर्वश्री गजानन निमदेव,श्रीपाद अपराजित आणि रमेश कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. माध्यम समन्वय अधिकारी अनिल गडेकर यांनी सूत्रसंचालन केले तर माहिती आयोगाच्या उपसचिव रोहिणी जाधव यांनी आभार मानले.