पारशिवनीतील दहेगाव जोशी ते इसापूर रस्त्यावर कन्हान नदीवरील पुलाचे भूमिपूजन
नागपूर समाचार : गेल्या दहा वर्षांमध्ये नागपूर जिल्ह्यात ४ हजार कोटी रुपयांची कामे मंजूर झाली. अनेक कामे झाली आहेत. ग्रामीण भागातील चित्र बदलले आहे. चौफेर विकासाच्या दिशेने आपण वाटचाल केली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (सोमवार) येथे केले.
पारशिवनी तालुक्यातील दहेगाव जोशी ते इसापूर रस्त्यावर कन्हान नदीवरील मोठ्या पुलाचे भूमिपूजन ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. 320 मीटरचा हा पूल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत 54 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणार आहे. भूमिपूजनानंतर सावनेर तालुक्यातील इसापूर येथे सभेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशीष जयस्वाल, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, माजी आमदार डी. मल्लिकार्जून रेड्डी, माजी आमदार अशोक मानकर, भाजप नेते राजीव पोतदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
या पुलामुळे पारशिवनीमध्ये उपलब्ध खनिज साठा कमी वेळेत नागपूर येथील बुटीबोरी औद्योगिक वसाहतीपर्यंत पोहोचवणे सोपे होईल. पारशिवनी तालुक्यातील शेतकऱ्यांना शहरातील बाजारपेठांपर्यंत पोहोचणे सुलभ होईल तसेच वाहतूकही सुरळीत होईल. पर्यायाने परिसराचा आर्थिक व सामाजिक विकास होईल व रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असा विश्वास ना. श्री. गडकरी यांनी व्यक्त केला.
पुलाला नारायणराव तांदूळकर यांचे नाव
नारायणराव तांदूळकर यांच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या श्रमामुळे आज पक्षाला चांगले दिवस आले आहेत. त्यांनी प्रतिकूल काळात पक्ष विस्ताराचे काम केले. गावांच्या विकासात त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे पुलाला नारायणराव तांदूळकर यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा ना. श्री. गडकरी यांनी केली.
ना. श्री. गडकरी यांचे जल्लोषात स्वागत
नागपूर ते इसापूर मार्गावर खापरखेडा, भानेगाव, पारशिवनी, करंभाड, दहेगाव जोशी, डाक बंगला पिपळा आदी ठिकाणी ना. श्री. गडकरी यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी स्वागताचे फलक लावले होते. तर काही ठिकाणी आगमनाला आतषबाजी करण्यात आली.
दोन राष्ट्रीय महामार्ग जोडले जातील
कन्हान नदीवरील पुलाच्या उभारणीमुळे नागपूर-सावनेर व आमडी-पारशिवनी-खापा हे दोन राष्ट्रीय महामार्ग जोडले जातील. या प्रकल्पामुळे सावनेर व पारशिवनी तालुका जोडला जाऊन प्रवासाचे अंतर ४० किलोमीटरने कमी होईल. त्यामुळे प्रवासाचा कालावधीही दीड तासाने कमी होईल. या प्रकल्पामुळे नागपूर-सावनेर महामार्ग थेट पारशिवनी व रामटेक तालुक्यातील पेंच अभयारण्याशी जोडले जातील.