उमरेड समाचार : आपल्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून उमरेड बसस्थानकाच्या पुनर्बाधणीसाठी सरकारने तब्बल साडे सात कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिल्याने उमरेड बसस्थानकाचा कायापालट होणार असल्याची प्रतिक्रिया माजी आ. राजू पारवे यांनी व्यक्त केली. उमरेड बसस्थानकाच्या पुनर्बाधणीसाठी सरकारने मंगळवारी (दि.८) 7.50 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. माजी आ. राजू पारवे यांनी या शासन निर्णयाचे स्वागत करत सरकारचे आभार मानले.
याबद्दल प्रतिक्रिया देताना श्री. पारवे म्हणाले की, उमरेडचे बसस्थानक हे एक महत्त्वाचे बसस्थानक असून स्थानिकसह राज्यभरातील प्रवाशांची येथून ये जा असते. त्यामुळे प्रवाशांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील होतो. त्या संदर्भात सरकार दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर आपल्या पाठपुराव्याला यश आले.
शासनाने उमरेड बसस्थानकाच्या पुनर्बाधणीसाठी तब्बल साडे सात कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. यातून ९ फलाटांसह बसस्थानकाची मुख्य इमारत, प्रवाशी प्रतिक्षालय, वाहतूक नियंत्रण कक्ष, बसस्थानक प्रमुख कार्यालय, तिकीट आरक्षण कार्यालय, महिला व पुरुष विश्रांतीगृह, पार्सल कार्यालय, प्रसाधनगृह, पिण्याच्या पाण्याची सोय आदी विकासकामं केली जाणार असल्याची माहिती राजू पारवे यांनी दिली.
प्रवाशांची सोय लक्षात घेऊन आपल्या मागणीचा गांभीर्याने विचार केल्याबद्दल माजी आ. राजू पारवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.