विदर्भ-मराठवाड्यातील पायाभूत सुविधांसाठी १,७३४ कोटी
नागपूर जिल्ह्यातील वीज बळकटीकरण ३१३ कोटी कामाचा सुभारंभ
विदर्भातील शेतकऱ्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
नागपूर समाचार : शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र वीज कंपनी तयार करण्यात आली असून त्याअंतर्गत करण्यात आलेल्या नियोजनामुळे पुढील २५ वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा करण्यात येणार आहे. सौरऊर्जेच्या वापराचे नियोजन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असून पंतप्रधानांनी महाराष्ट्राचे धोरण इतर राज्यानी राबवावे अशा सूचना केल्याचे गौरोद्गार उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
वनामती येथील सभागृहात विदर्भ व मराठवाड्याचे पायाभूत सुविधा सक्षमीकरण व विस्तारीकरणाच्या १ हजार ७३४ कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ, नागपूर जिल्ह्यातील ३१३ कोटी रुपयाचा विद्युत यंत्रणा बळकटीकरण, पंतप्रधान सुर्यघर मोफत वीज योजने अंतर्गत विदर्भातील लाभार्थी शेतकऱ्यांचा सन्मान तसेच मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजने अंतर्गत शेतकऱ्यांचा सन्मान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आमदार ॲड. आशिष जायस्वाल, डॉ. परिणय फुके, ऊर्जा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
नागपूर शहर वेगाने वाढत असून सभोवतालच्या परिसरामध्ये चांगल्या प्रकारचा अखंडित वीज पुरवठा करण्याला प्राधान्य देण्यात आले असून त्यासाठी वीजेच्या वितरणाचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे. नागपूर जिल्ह्यातील वीज वितरण यंत्रणा बळकटीकरणासाठी ३१३ कोटी रुपयाच्या योजना राबविण्यात येत असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. त्यासोबतच शहरातील विजेचे जाळे भुमिगत करण्यात येणार असल्यामुळे शहराचे सौदर्यीकरण वाढत असल्याचे सांगतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात आतापर्यंत ४० हजार मेगावॅट स्थापीत क्षमता होती परंतु मागील अडीच वर्षात केलेल्या नियोजनामुळे पुढील पाच वर्षात ४५ हजार मेगावॅट क्षमता अतिरिक्त वाढणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात व राज्यात अखंडित वीज पुरवठा करणे सुलभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात वीज निर्मीतीसाठी कोळशाचा वापर होत असून यामुळे पर्यावरणाचेही हानी होत आहे. कोळशाचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे विजेच्या दरावर त्याचा परिणाम होत आहे. राज्यात केवळ १६ टक्के अपारंपारीक ऊर्जा निर्माण होत असून सन २०३० पर्यंत ५४ टकके वाढविण्यात येणार आहे. सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्यासोबतच त्यांच्याकडे अतिरिक्त असलेली वीज खरेदी करण्यात येणार असल्याचे सांगतांना श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, येत्या १८ महिन्यात १६ हजार मेगावॅट सौरऊर्जा निर्मीतीचया उद्दिष्टापैकी १४ हजार मेगावॅट वीज निर्मीती होईल.
शेतकऱ्यांना वर्षभर दिवसा १२ तास वीज पुरवठा करण्यात येणार असल्यामुळे रात्रीच्या विजेची आवश्यकता राहणार नाही. सौरऊर्जेवर ऊर्जा निर्मीतीसाठी पंतप्रधानांनी या योजनेचे स्वागत केले आहे. त्यामुळे वीज निर्मीतीचे महाराष्ट्र मॉडल संपूर्ण देशात राबविले जाईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पंतप्रधान सुर्यघर मोफत वीज योजने अंतर्गत राज्यातील दुसरे सौरग्राम पुणे जिल्ह्यातील टेकवडीचे लोकार्पण व सरपंच विठ्ठल शत्रृघ्न शिंदे यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन उपमुख्यमंत्र्यांनी गौरव केला. नागपूर जिल्ह्यातील बळीराजा मोफत वीज योजना व पंतप्रधान सुर्यघर मोफत वीज योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना यावेळी सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महवितरणचे संचाकल प्रसाद रेशमे व कार्यकारी संचालक धनंजय औढेकर यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.