नागपूर समाचार : शहरातील वाहतूक शाखेत विविध शाखा व पोलीस ठाण्यांतून नव्याने नियुक्त झालेले पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांचे वाहतुकीचे प्रशिक्षण ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क, धरमपेठ येथे सुरू आहे. नागपूर शहराचे पोलीस आयुक्त, डॉ. रवींद्र कुमार सिंगल, यांनी नव्याने रुजू झालेले अधिकारी आणि अंमलदार यांचे वाहतूक नियमन, नियंत्रण, तसेच वाहतूक चिन्हांबाबत आयोजित तीन दिवसीय प्रशिक्षणाला आज २२ ऑक्टोबरला सायंकाळी ४:३० वाजता वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त श्री. अर्चित चांडक यांच्यासह भेट दिली.
वाहतूक पोलिसांविषयी सर्वांनाच कुतूहल असते. वाहतूक पोलीस हा पोलीस खात्याचा आरसा आहे, कारण दररोज रस्त्यांवरून हजारो-लाखो नागरिक ये-जा करतात, आणि प्रत्येक टप्प्यावर चौकांमध्ये वाहतूक अंमलदार नागरिकांच्या संपर्कात किंवा दृष्टिक्षेपात येतात. पोलीस खात्यात वाहतूक पोलिसांची नियुक्ती कशी होते आणि ते प्रशिक्षण कसे घेतात, याबाबत सर्वसामान्यांना कुतूहल असते. सध्या पोलीस आयुक्तांनी प्रशिक्षण घेत असलेल्या अंमलदारांशी संवाद साधताना नमूद केले की, नव्याने नियुक्त केलेले अंमलदार त्यांच्या रेकॉर्डच्या आधारे निवडले गेले आहेत. नवीन पोलिसांना वाहतूक शाखेत नियुक्त करण्यास प्राथमिकता दिली आहे. त्यांच्या वरिष्ठांमार्फत त्यांच्या चरित्राची तपासणी करून, तसेच रेकॉर्डमधील बक्षिसे व शिक्षांचा विचार करून ही नियुक्ती केली आहे. वाहतूक शाखेत कार्यरत असताना त्यांना नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. समाजासाठी चांगले काम करणे हे त्यांचे ध्येय असले पाहिजे.
नागपूर शहरातील पोलिसांसमोर सर्वात मोठे आव्हान हे आहे की, जितके चांगले काम केले जाईल, तितकी पोलिसांची प्रतिमा सकारात्मक होईल. वाहतूक पोलीस हा पोलीस खात्याचा आरसा असतो, कारण रस्त्यांवर काम करताना पोलिसांची प्रतिमा नागरिकांमध्ये रुजते. आयुक्तांनी अंमलदारांना सांगितले की, वाहतूक नियमन करताना टर्नआऊट चांगला ठेवावा, आचरण आणि संवाद सहानुभूतीपूर्वक असावा. पोलीस आयुक्तांनी नागपूर शहरातील जनतेला हेल्मेट वापरण्याचे महत्त्व देखील समजावून सांगितले.
हेल्मेट वापरल्याने अपघातांचे प्रमाण 80% कमी होऊ शकते. तसेच, वाहतूक नियमन करताना दंडवसुली हाच मुख्य उद्देश नसून लोकांमध्ये शिस्त व नियमांचे पालन वाढवणे हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाहतूक पोलिसांच्या आरोग्याबाबतही आयुक्तांनी सल्ला दिला. वाहतूक नियमन करताना वायू प्रदूषण पासून बचाव करण्याकरिता मास्क वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच, रोज सकाळी मेडिटेशन केल्याने तणावमुक्त राहण्यास मदत होईल आणि लोकांशी शांतपणे संवाद साधता येईल. काम आणि कौटुंबिक जीवन यामध्ये फरक राखण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. पोलीस आयुक्तांनी प्रशिक्षणाच्या दरम्यान काय शिकवले जात आहे याचाही आढावा घेतला.
यात वाहतूक नियंत्रण, वाहतूक चिन्हे व खुणा, सिग्नल व चौकांचे प्रकार, तणावमुक्त राहण्याचे तंत्र, संभाषण कौशल्य, रस्ता सुरक्षा नियम, मोटर वाहन कायदा, ब्रेथ अनालायझर आणि चलन डिव्हाइस हाताळणे यासारख्या विषयांचा समावेश होता. शेवटी, पोलीस आयुक्तांनी सांगितले की, वरिष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना मदत करणे हा वाहतूक पोलिसांचा कर्तव्याचा एक महत्त्वाचा भाग असावा. प्रशिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी वरिष्ठ नागरिक, पोलीस मित्र, आणि सामान्य नागरिकांचाही सहभाग असावा, असेही पोलीस आयुक्त सिंगल म्हणाले.