नागपूर समाचार : विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांच्या मनात आपल्या राष्ट्रीय कर्तव्याप्रती जागृती निर्माण व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. सर्व स्तरावरील मतदारांना हा उपक्रम आपला वाटावा, त्यांचा कृतिशील सहभाग वाढवा यासाठी विभागप्रमुखांनी तत्पर राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.
स्वीप अंतर्गत उपक्रमाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे आदी अधिकारी उपिस्थित होते.
ग्रामीण भागाच्या बरोबरीने शहरी भागात मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी विविध उपक्रमांची निश्चिती करुन ते यशस्वीपणे राबविण्यावर स्वीप अंतर्गत भर दिला पाहिजे. जवळपास दोन लाख युवक आणि नवमतदारांची संख्या आहे. पात्र मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क अधिक उत्साहाने बजावता यावा यासाठी निवडणूक विभाग प्रयत्नरत असून दिव्यांग ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी यांच्यासाठी संबंधित विभागांनी योग्य समन्वय साधण्याचे निर्देश त्यांनी दिले.