नागपूर समाचार : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाने उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली. मात्र काही नेत्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरीला सुरुवात केली.
नागपुरात महायुतीतील पहिली बंडखोरी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्या व राज्य महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे यांनी केली आहे. त्यांनी गुरुवारी पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.
गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत कृष्णा खोपडे हे पूर्व नागपुरातून विजयी झालेले आहेत. यावेळी देखील भाजपने त्यांनाच उमेदवारी दिली आहे. जो उमेदवार जिंकू शकेल त्यालाच उमेदवारी मिळेल अशी भूमिका महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत मांडण्यात आली होती. मात्र नागपुरात या उमेदवारीवरून नाराजीचा सुर आहे.
महाविकास आघाडीकडून पूर्व नागपुरचा अधिकृत उमेदवार जाहीर झाला आहे. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) दुनेश्वर पेठे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. पांडे व पेठे यांच्यातदेखील राजकीय वाद आहे. आता पांडे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे मतांमध्ये मोठी तफावत निर्माण होणार आहे. याचा फटका भाजपाला बसणार की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला बसेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.