निरुपयोगी वस्तू संकलन/दान केंद्राचे आयुक्त डॉ. चौधरींच्या हस्ते उद्घाटन
मनपाच्या अभिनव उपक्रमाला पहिल्यादिवशी उदंड प्रतिसाद
नागपूर समाचार :- नागपूर महानगरपालिकेद्वारा स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी अभियानांतर्गत दिवाळीतील निरुपयोगी वस्तू संकलन केंद्र शहरातील विविध ठिकाणी उभारण्यात आले, यातील मंगळवारी झोन येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय परिसरातील निरुपयोगी वस्तू संकलन केंद्राचे उद्घाटन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते शनिवारी (ता: २६) करण्यात आले. तसेच मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी धंतोली उद्यान परिसरात उभारण्यात आलेल्या केंद्राला भेट देत नागरिकांशी संवाद साधला. उद्घाटन प्रसंगी मनपाचे उपायुक्त विजय देशमुख, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी केंद्रावर उपस्थित होते.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल व अजय चारठाणकर यांच्या मार्गदर्शनात दिवाळीतील निरुपयोगी वस्तू संकलन मोहीम सुरु करण्यात आली असून, आयुक्तांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मनपाच्या केंद्रांवर घरातील निरुपयोगी वस्तू दान केल्या. शनिवार सकाळपासून नागरिकांनी केंद्रंकडे धाव घेत घरातील घरातील पुनर्वापरण्यात येणाऱ्या किंवा निरुपयोगी वस्तु/साहित्य जसे कपडे, लाकडी वा प्लास्टिकच्या वस्तू, घरातील भांडी, खुर्च्या, खेळणी, कपाट, चपला /जोडे, पुस्तकांची रद्दी, इलेक्ट्रॉनिक वस्तू या संकलन केंद्रामध्ये जमा केल्या.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी स्वतः विविध केंद्रांवर भेट देत नागरिकांचा उत्साह वाढविला. मनपाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील घरातील निरुपयोगी वस्तू दान करीत अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
दिवाळीनिमित्त स्वच्छते दरम्यान घरातून निघणाऱ्या वस्तूंचे संकलन करून त्याचा पुनर्वापर करण्याचा महत्त्वाचा निर्णय नागपूर महानगरपालिकेने स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी अभियानंतर्गत घेतला आहे. घरातून निघणाऱ्या वापरात नसणाऱ्या वस्तूंचा स्वीकार करण्यासाठी मनपाने दहाही झोन निहाय निरुपयोगी वस्तू संकलन/स्वीकार केंद्रे उभारण्यात आले असून, पहिल्या दिवशी नागरिकांनी मोहिमेला उदंड प्रतिसाद दर्शविला, ही केंद्रे सोमवार 28 ऑक्टोबर सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत नागरिकांच्या सेवेत राहणार आहेत. तरी नागरिकांनी आपल्या घरातील पुनर्वापरण्यात येणाऱ्या किंवा निरुपयोगी वस्तु/साहित्य/ इलेक्ट्रॉनिक वस्तू संकलन केंद्रामध्ये जमा करून गरज वंताना लाभ देण्यास सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. चौधरी यांनी केले आहे.
‘थँक यू’चे स्टिकर्स ने भारावले नागरिक
संपूर्ण शहरात मनपाद्वारे प्रभाग स्तरावर उभारण्यात आलेल्या निरुपयोगी वस्तू दान/संकलन केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रांवर नागरिकांनी आपल्या घरातील निरुपयोगी वस्तू स्वतंत्र वर्गीकरण करून केंद्रावर जमा केल्या. वर्गीकृत स्वरूपात जमा करून अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविणाऱ्या नागरिकांना नागपूर महानगरपालिकेद्वारे ‘थँक यू’चे स्टिकर्स देण्यात आले. आपल्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त होत असल्याचे बघून नागरिक भारावून केले.