- Breaking News, नागपुर समाचार, विधानसभा चुनाव

नागपूर समाचार : पश्चिम नागपूरची जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकू – संदीप जोशी

एकजुटीने कार्य करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन

नागपूर समाचार : पश्चिम नागपूर विधानसभा संघ हा मागील अनेक वर्ष भाजपाचा मतदारसंघ राहिला आहे. भारतीय जनता पक्षाच्या विजयात मधल्या काळात खंड जरी पडला तरी यावेळी पश्चिम नागपूरची जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकू, असा विश्वास व्यक्त करीत माजी महापौर संदीप जोशी यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले आहे.

विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पश्चिम नागपूरचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने पक्षाच्या कार्यकर्त्यांशी ते संवाद साधत होते. मंचावर पश्चिम नागपूरचे उमेदवार सुधाकर कोहळे, जयप्रकाश गुप्ता, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी महापौर माया इवनाते, माजी नगरसेवक संदीप जाधव, अश्विनी जिचकार, माजी नगरसेविका प्रगती पाटील उपस्थित होते.

पुढे बोलताना संदीप जोशी म्हणाले, भारतीय जनता पक्षाने तळागातील कार्यकर्ता असलेले सुधाकर कोहळे यांना उमेदवारी देउन पक्षातील सर्वसामान्य शेवटच्या कार्यकर्त्याचा सन्मान केला आहे. पक्षाने तिकीट जाहीर केल्यानंतर आता पक्षाच्या निर्णयाचा सन्मान करून उमेदवाराच्या पाठीशी ताकदीने उभे राहण्याचे प्रत्येक कर्तव्य आहे. भारतीय जनता पार्टी संघर्षातून उभा राहिलेला पक्ष आहे. पक्षासाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय यांनी बलीदान दिले आहे. त्यांची शिकवण अंगीकारून प्रत्येक कार्यकर्त्याने शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून पक्षाचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना निवडूण आणण्यासाठी कार्य करा, असे आवाहन देखील संदीप जोशी यांनी केले आहे.

भारतीय जनता पार्टीने माझ्यासारख्या अनेक सामान्य कार्यकर्त्यांना नाव दिलं, ओळख दिली, पद दिले, पक्षाचे पदाधिकारी म्हणून जबाबदारी दिली आहे. त्या पक्षाच्या सोबत नेहमी राहणे हे आपले कर्तव्य आणि जबाबदारी आहे. ज्या पक्षाने सन्मानाने सर्व दिले त्या पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे की प्रत्येक कामात अडचण निर्माण करणाऱ्या काँग्रेसच्या मागे राहायचे हे ठरविण्याची वेळ आली असल्याचेही ते म्हणाले. अंबाझरी परिसरात असलेले भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडण्याचे काम काँग्रेसच्या कार्यकर्त्याने केले. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार राज्यात होते. मात्र त्यावेळी या प्रकरणात काँग्रेसचा आमदार म्हणून विकास ठाकरे यांनी कोणतिही भूमिका घेतली नसल्याचा आरोपही संदीप जोशी यांनी केला. या प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची भूमिका घेउन आंबेडकर भवन पाडण्याला स्थगिती दिली, असेही त्यांनी सांगितले.

प्रत्येक सामान्य कार्यकर्ता हा भारतीय जनता पक्षाची खरी ताकद आहे. कार्यकर्ता म्हणून आपण सर्वांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून एकजुटीने कार्य करावे. कारण पक्षाचा इतिहास जेव्हा सांगितला जाईल तेव्हा आपले नाव सोबत असणाऱ्यांच्या यादीत असेल गद्दारांच्या यादीत नाही, असा मंत्रही माजी महापौर संदीप जोशी यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *