- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : गडकरींनी आधार दिला अन् आयुष्य ‘उभे’ झाले

मनीष गवईचा २८ वर्षांचा संघर्ष; डायस्टोनियामुळे उभेही राहता येत नव्हते

नागपूर समाचार :- मनीष गवई नावाचा एक तरुण बालपणापासून डायस्टोनिया नावाच्या असाध्य आजाराने ग्रस्त असतो. शरीरामध्ये ससतच्या कंपनांमुळे साधे उभे राहणेही त्याला शक्य नसते. आजारावर उपचार करण्यासाठी कुटुंबाचे आर्थिक कंबरडे मोडले. अशात एक दिवस केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना मनीषच्या आजाराविषयी माहिती मिळते. ते बंगळुरू येथे मनीषच्या उपचाराची व्यवस्था करतात. आर्थिक पाठबळ मिळवून देतात. आज मनीष स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. गडकरींच्या संवेदनशिलतेमुळे मनीषचे आयुष्य उभे झाले, अशी भावना त्याचे कुटुंबीय व्यक्त करतात.

दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मनीष व त्याचे वडील सुरेश गवई ना. श्री. गडकरी यांच्या भेटीला आले होते. त्यावेळी त्यांनी गडकरींप्रति कृतज्ञता व्यक्त केली. मनीष मूळचा मुर्तिजापूरचा रहिवासी. गेल्या २८ वर्षांपासून तो डायस्टोनिया या आजाराने ग्रस्त आहे. मेंदूतून पायाकडे जाणाऱ्या पेशींना रक्तपुरवठा थांबला, की हा आजार होतो. यामध्ये संपूर्ण शरीरात पूर्णवेळ कंपने येत असतात आणि उभे राहता येत नाही, मान स्थिर नसते आणि झोपही लागत नाही. मनीषनेही हा त्रास सहन केला. एवढा की रात्री झोप सुद्धा लागायची नाही. त्यामुळे मानसिक ताण वाढत गेला. दुसरीकडे वडील उपचारासाठी त्याला मुंबई, पुणे, बंगळुरूला घेऊन फिरायचे. वडीलही आर्थिकदृष्ट्या खचून गेले.

अशात एक दिवस मनीष आणि त्याच्या वडिलांनी ना. श्री. गडकरींची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. १२ वर्षे मुंबईत धिरुभाई अंबानी रुग्णालयातही उपचार घेऊन बघितला, पण उपयोग झाला नाही. त्यानंतर बंगळुरूमधील राष्ट्रीय मानसिक स्वास्थ्य व स्नायू विज्ञान संस्थान (निमहान्स) येथे या आजारावर उपचार उपलब्ध आहे; पण त्यासाठी लावण्यात येणारे मशीन जवळपास पंधरा लाखांचे आहे, असे त्यांनी ना. श्री. गडकरींना सांगितले. गडकरींनी तातडीने उपचाराची सोय करून देण्याची सूचना आपल्या अधिकाऱ्यांना केली. त्यांनी आरोग्य मंत्र्यांसोबत पत्रव्यवहार केला. मनीषला उपचारासाठी आर्थिक सहकार्य मिळाले.

सलग दहा महिने बंगळुरूमध्ये उपचार घेतल्यानंतर मनीषच्या डोक्यामध्ये एक मशीन लावण्यात आले. या मशीनची बॅटरी त्याच्या छातीमध्ये लावण्यात आली. २७ ऑक्टोबर २०२३ ला मनीषवर शस्त्रक्रिया करण्यात आली. महिन्याभराच्या आतच त्याला स्वतःच्या पायावर उभे राहता आले. शरीरातील कंपने जवळपास संपुष्टात आली. त्याच्यावरील मानसिक ताण कमी झाला.

पूर्वी अन्नाचा घास तोंडातून बाहेर पडून जायचा. आज तो व्यवस्थित जेवण करू शकतो. या सर्वांचे श्रेय मनीष व त्याचे वडील ना. श्री. गडकरींना देतात. ‘साहेबांनी वेळेवर मदत केली नसती तर कदाचित मनीष आयुष्यभर स्वतःच्या पायावर उभा राहू शकला नसता,’ अशी भावना त्याचे वडील सुरेश गवई व्यक्त करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *