काटोल समाचार : जाती पातीच्या आधारावर मतदान करू नका. जातीयता नष्ट करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. जे नेते स्वतःच्या ताकदीवर लढू शकत नाहीत ते जातीची ढाल घेऊन तुमच्या पुढे येतात. त्यामुळे आपले भविष्य बदलायचे असेल तर भ्रष्टाचाराचा डाग नसलेल्या प्रामाणिक उमेदवाराला आणि पक्षाला निवडून द्या, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (सोमवार) काटोलवासीयांना केले.
काटोल व नरखेड येथे या मतदारसंघाती भाजप-महायुतीचे उमेदवार चरणसिंग ठाकूर यांच्या प्रचारार्थ ना. श्री. नितीन गडकरी यांची जाहीर सभा झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, काटोलचे निवडणूक प्रभारी अविनाश ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘गेल्या दहा वर्षांमध्ये आपल्या भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. फक्त माझ्या विभागातर्फे काटोल मतदारसंघात दोन हजार कोटी रुपयांची कामे झाली आहेत आणि काही सुरू आहेत. पण काटोलचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर गावासाठी झटणाऱ्या एका प्रामाणिक नेतृत्वाची गरज आहे. चरणसिंग ठाकूर यांच्यामध्ये गावाचे-परिसराचे चित्र बदलण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा.’
काटोल ते वरूड पुलाकरिता दीडशे कोटी रुपये मंजूर झाले आहेत. नागपूर ते काटोल या रस्त्यावर १४ ठिकाणी दीडशे कोटी रुपये जास्तीचे खर्च करून अंडरपास बांधण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. कळमेश्वरला गेल्यानंतर सावनेर ते गोंडखैरी हा चारपदरी रस्ता उत्तम झाला आहे. आता नागपूर आणि अमरावतीसाठी पर्यायी मार्ग त्यानिमित्ताने तयार झाला, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले. काटोल, नरखेड, वरूड, मोर्शी या सर्व भागांमध्ये पाण्याची पातळी खाली जात आहे. त्यामुळे येत्या काळात जलसंवर्धनाचे काम मोठ्या प्रमाणात केले जाणार आहे, असेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढले पाहिजे. त्यांच्या शेतमालाला भावही मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना नफा मिळवायचा असेल तर बाजारपेठेच्या आणि काळाच्या मागणीनुसार पीकपद्धती बदलण्याचा विचार करणेही तेवढेच गरजेचे आहे, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.