- Breaking News, Meeting, आयोजन, नागपुर समाचार, विधानसभा चुनाव

सावनेर समाचार : काँग्रेसने ग्रामीण भागाला विकासापासून वंचित ठेवले; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची टीका

सावनेर येथे जाहीर सभा

सावनेर समाचार : काँग्रसने देशात साठ वर्षे सत्ता उपभोगली. पण देशातील ग्रामीण भागाला विकासापासून वंचित ठेवले, अशी टीका केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी आज (सोमवार) कळमेश्वर येथे केली. त्याचवेळी अटलजींच्या नेतृत्वातील सरकारने आणि आता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने ग्रामीण भागाच्या विकासाला सर्वाधिक प्राधान्य दिल्याचेही त्यांनी नमूद केले.

सावनेर विधानसभा मतदारसंघातील कळमेश्वरमध्ये येथील भाजप-महायुतीचे उमेदवार डॉ. आशीष देशमुख यांच्या प्रचारार्थ ना. श्री. गडकरी यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. आशीष देशमुख यांना सेवा करण्याची संधी दिली तर कळमेश्वर-सावनेरची बुलेट ट्रेन दुप्पट वेगाने धावेल, असा विश्वासही त्यांनी स्थानिकांना दिला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘या देशाने साठ वर्षे काँग्रेसला संधी दिली. काँग्रेसनेही लोकांना खूप आश्वासने दिली. पहिले लोकांनी बैलजोडीवर ठप्पे मारले. नंतर गाय-वासरूवर ठप्पे मारले. मग पंज्यावर ठप्पे मारले. पुढे काँग्रेस फुटत गेली. हिंदीतील प्रसिद्ध व्यंगकवी स्व. शरद जोशी यांनी तर काँग्रेसवर एक कविताच लिहिली होती. ते म्हणतात, ‘काँग्रेस एक आश्चर्य है… उत्तर में हारती है तो दक्षिण में जितती है… दक्षिण में हारती है तो उत्तर में जितती है… काँग्रेस एक समस्या है… समस्या ही काँग्रेस है. पुंजिपतीओं को दिलासा देती है और गरिबी हटाओ का नारा देती है’…’

ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘१९४७ पासून आजपर्यंत काँग्रेसने खूप घोषणा केल्या. देशाच्या भविष्याचे नुकसान केले. चुकीच्या पद्धतीने राज्य कारभार केला. स्टिलचे कारखाने टाकले, ते डुबले. हॉटेल टाकले, तेही डुबले. विकासाच्या बाबतीत काँग्रेसचे प्राधान्यच चुकले. खऱ्या अर्थाने गाव गरीब मजदूर आणि शेतकऱ्यांच्या विकासाला, सिंचनाला, कृषी मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना, पाणी पुरवठा आणि रस्त्यांना प्राधान्य द्यायला हवे होते. मात्र, काँग्रेसने गावांकडे पूर्ण दुर्लक्ष केले. महात्मा गांधींनी रामराज्य आले पाहिजे, असे म्हटले होते. काँग्रेसच्या काळात कुठे होते रामराज्य? त्यांनी फक्त गांधीजींचे नाव घेतले. त्यांच्या विचारांचे अनुकरण केले नाही. आज देशातील परिस्थिती बदलायला सुरुवात झाली आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *