- Breaking News, नागपुर समाचार, विधानसभा चुनाव

नागपूर समाचार : आमच्या सरकारने जात-पात न बघता लोकांची सेवा केली – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

पश्चिम, उत्तर व पूर्व नागपुरात जाहीर सभा

नागपूर समाचार : केंद्रातील एनडीए सरकार आणि राज्यातील महायुतीच्या सरकारने कधीही जात-पात बघून सेवाभावात बदल केला नाही. आयुष्यमान योजना असो वा लाडकी बहीण योजना असो; जात आणि धर्म बघून योजनांचा लाभ दिला गेला नाही. सर्वाना लाभ मिळेल याची काळजी आम्ही घेतली. याउलट काँग्रेसने कायम जातीयवादाचे विष पेरले, अशी टीका केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (रविवार) केली.

पश्चिम नागपूरमध्ये सुधाकर कोहळे, उत्तर नागपूरमध्ये डॉ. मिलिंद माने व पूर्व नागपूरमध्ये कृष्णा खोपडे यांच्य प्रचारार्थ ना. नितीन गडकरी यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या. त्यावेळी ते बोलत होते.

ना. गडकरी म्हणाले, ‘आमच्यासाठी राजकारण हे सेवा करण्याचे माध्यम आहे. त्यामुळे काम करताना आम्ही कधीही जात-पात बघितली नाही, बघत नाही. आम्ही दलितांच्या विरोधात आहे, असा अपप्रचार करण्यात आला. मी महाराष्ट्रात मंत्री होतो तेव्हा दीक्षाभूमीचे काम बंद पडले होते. आमच्या कार्यकाळात ते काम पूर्ण झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींशी संबंध असलेल्या चिचोलीला महत्त्व प्राप्त करून दिले. कामठी येथील ड्रॅगन टेम्पल आमच्या काळात जागतिक आकर्षणाचे केंद्र बनले. कामठीतील मेट्रो स्टेशनला ‘ड्रॅगन टेम्पल स्टेशन’ असे नाव देण्याचा निर्णय झाला आहे.’

कमाल चौकात माझ्या आईच्या नावाने डायग्नोसिस सेंटर सुरू केले जात आहे. त्याठिकाणी महागड्या तपासण्या अतिशय माफक दरात करून दिल्या जातील, अशी माहिती ना. गडकरी यांनी दिली. ‘मी पालकमंत्री होतो तेव्हा मला इंजिनिअरिंग कॉलेज मिळाले होते. मी नाही घेतले. शिक्षकांचा अर्धा पगार घ्या, नोकरी लावून द्यायला पैसे घ्या अशा भानगडीत पडायचे नव्हते. त्यामुळे मला ते कामच करायचे नव्हते. अनेक नेत्यांनी इंजिनियरिंग, डीएड-बीएड कॉलेज घेतले. माझ्या वाट्याला आलेले कॉलेज मी अंजूमन शिक्षण संस्थेला दिले. त्याठिकाणी हजारो मुस्लीम तरुण-तरुणी शिकले,’ याचाही ना. गडकरी यांनी आवर्जून उल्लेख केला.

ना. गडकरी म्हणाले, ‘दहा वर्षांमध्ये नागपुरात एक लाख कोटींपेक्षा जास्त निधीची कामे झालीत. नागपूरची मेट्रो कामठीपर्यंत जाणार आहे. नागपूर बदलत आहे. नागपूर हे देशातील पहिले शहर आहे, जिथे ७५ टक्के जनतेला १२ ते २४ तास पाणी मिळते. पक्के सिमेंट काँक्रिटचे रस्ते झाले आहेत. पुढची अनेक वर्षे हे रस्ते टिकणार आहेत. त्यामुळे उमेदवार मत मागायला येतील, तेव्हा लोक काम विचारतील. त्यावेळी काँग्रेसकडे उत्तर नसेल.’

हलबा समाजाच्या समस्या सोडवल्या

काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला. पण काँग्रेस नेत्यांची गरिबी हटली. सर्वसामान्य लोकांची गरिबी हटली नाही. साठ वर्षांत काँग्रेसने हलबा समाजाचे प्रश्न सोडवले नाही. आम्ही दहा वर्षांत हलबा समाजाच्या समस्या सोडवल्या, असे ना. गडकरी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *