- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपूर समाचार : महायुती मजबूत आणि अभेद्य; शिंदेच्या भूमिकेचे स्वागत – चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून समर्थन 

नागपूर समाचार : महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार मजबूत आणि अभेद्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी भूमिका घेतली, ती राज्याच्या चौदा कोटी जनतेसाठी एक मोठी भूमिका असून आम्ही स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे केंद्रीय नेतृत्त्व जो निर्णय करेल तो सर्वांनाच मान्य असेल, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचे समर्थन केले. आमची लढाई मुख्यमंत्रीपदासाठी नाही तर महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणसाठी आहे, असेही ते म्हणाले. 

नागपूर येथे पत्रकार परिषेत श्री बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचे स्वागत करताना आभार व्यक्त केले. डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून राज्याला पुढे नेण्याचे काम केले, असे सांगून ते म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे यांची भूमिका महाराष्ट्राला पुढे नेणारी आहे. विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राला अधिक बळकटी मिळाली आहे. महायुतीच्या अभूतपूर्व विजयात तिन्ही नेते आणि सर्व घटक पक्षांची मेहनत असून त्यामुळे मोठा जनादेश मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांनी कणखर मुख्यमंत्री म्हणून मागील अडीच वर्षे काम केले असून समाजाच्या प्रत्येक घटकाला व महाराष्ट्राच्या विकासाला न्याय दिला. युती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या योजनांना बंद करण्याचे काम महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. बंद पडलेल्या विकास प्रकल्पांना गती देण्याचे काम मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे. 

श्री बावनकुळे म्हणाले, आम्ही आधीपासूनच एकनाथ शिंदे यांचं काम बघतोय, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना एकनाथ शिंदे यांनी एक मंत्री म्हणून उत्कृष्ट काम केले. देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्याला खंदा लाऊन समृद्धी महामार्गासारखा मोठा महामार्ग पूर्ण केला. उद्धव ठाकरे यांनी भाजपाला धोका दिला. हे शिंदे यांना पटले नाही आणि त्यासाठी हिंदुत्वाची भूमिका घेऊन, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारला पुढे घेऊन महायुतीचे सरकार सत्तेत आणण्यासाठी मोठी भूमिका घेतली होती. 

श्री बावनकुळे असेही म्हणाले

⁕ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्यावेळी महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी आणि मित्र पक्षांनी एकत्र काम केले 

⁕ आतापर्यंतच्या इतिहासात इतके बहुमत मिळाले नव्हते. तेवढे संख्याबळ आमच्या महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी मिळवले आहे

⁕ मोदीजींच्या नेतृत्वात महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी बहुमत मिळवले आणि महायुती भक्कम करण्याचे काम केले

⁕ मराठा आरक्षण, सामाजिक समता, ओबीसी आरक्षण, सामाजिक न्याय, आदिवासींना न्याय, समाजातील प्रत्येक घटकाला न्याय, विकासाला न्याय, रखडलेल्या प्रकल्पांना गती दिली. 

⁕ महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी या राज्याच्या हितासाठी योजना आणल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, शेतकऱ्याला एक रुपयात पीकविमा, शेतकऱ्यांचे वीजबिल माफ योजना या योजना राबविल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *