जागतिक क्षयरोग दिनापर्यंत चालणार मोहिम
नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिका व शहर क्षयरोग अधिकारी कार्यालय, नागपूर आरोग्य विभागातर्फे टी. बी. मुक्त भारत अभियान अंतर्गत ‘१०० दिवसीय क्षयरोग दुरीकरण मोहीम’ कार्यक्रमाचा मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या हस्ते शनिवारी (ता.७) शुभारंभ झाला. सदर येथील जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल होत्या. त्यांनी ‘निक्षय वाहनाला’ हिरवी झेंडी दाखविली. यावेळी सर्व उपस्थितांनी “टी. बी. मुक्त भारत” ची शपथ घेतली.
यावेळी मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त मुख्य वैद्यकीय अधिकारी, एसटीडीसी डॉ. ज्योती मडावी, अति. जिल्हा क्षयरोग अधिकारी जिल्हा परिषद, डॉ.सिंग, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार, मेयो आरइएसपी मेडिकल विभाग प्रमुख डॉ. राधा मुंजे, मेयोचे डॉ. सुशांत, डब्ल्यूएचओ सल्लागार डॉ. संकेत नांदेडकर, आरोग्य अधिकारी डॉ. नदीम खान, मनपा झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपांकर भिवगडे, डॉ. सुनील कांबळे, डॉ. अतीक खान, डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन, डॉ. विजयकुमार तिवारी, डॉ सुलभा शेंडे, डॉ. वर्षा देवस्थळे, डॉ. वसुंधरा भोयर, डॉ. शीतल वंदिले, डॉ. सुलभा शिंदे यांच्यासह इतर आरोग्य अधिकारी व कर्मचारी, सामाजिक संस्थांचे प्रमुख उपस्थित होते.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे १०० दिवसीय क्षयरोग शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. ही मोहिम ७ डिसेंबर २०२४ ते २४ मार्च २०२५ (जागतिक क्षयरोग दिन) पर्यंत राबविण्यात येणार आहे. क्षयरोग दुरीकरणासाठी सतत प्रयत्न केले जातात. शंभर दिवस ‘निक्षय वाहन’ नागपूर शहरातील विविध भागात जाऊन जनजागृती करतील. केंद्र सरकारची “१०० दिवसीय क्षयरोग दुरीकरण मोहीम” शहरात राबविण्यात येणार असून आपण सर्व क्षयरोग मुक्त भारत करण्यात योगदान देऊया. सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले असून ठिकठिकाणी अतिजोखीमग्रस्त भागात जाऊन क्षयरोगाविषयी जनजागृती करण्याचे आवाहन यावेळी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी केले.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनामध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या नेतृत्वात क्षयरोग दुरीकरण मोहिमेला सुरूवात झाली. शहर क्षेत्रातील जास्तीत जास्त क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचारावर आणणे, क्षय रुग्णांचा मृत्यूदर कमी करणे, नवीन क्षयरुग्णांचे प्रमाण कमी करणे, वंचित व अतिजोखमीच्या घटकापर्यंत पोहोचून आरोग्य सेवा पुरविणे, क्षयरोग विषयी जनजागृती करणे, समाजामधील क्षयरोग विषयी जनजागृती करणे व सामाजिक कलंक कमी करण्यासाठी उपक्रम राबविणे, म.न.पा.तील संमती दिलेल्या क्षयरुग्णांना पंतप्रधान क्षयमुक्त भारत अभियानाअंतर्गत निक्षय मित्र यांचेकडून पोषण आहार किटचे वाटप करणे, हा या मोहीमेचा उद्देश आहे.
क्षयरोगाचे कारण, त्याचे निदान, क्षयरोगामुळे होणारे मृत्यूदर कमी करणे, रुग्णाला पोषक आहार मिळणे हे या मोहिमेचे मुख्य उद्देश्य आहे. अति जोखीम ग्रस्त भागात ठिकठिकाणी जाऊन निक्षय शिबीर राबवून आरोग्य अधिकारी, यूपीएचसी, आमदार, नगरसेवक, सामाजिक संस्था, निक्षय मित्र, युवा वर्ग या सर्वांची मदत घेऊन क्षयरोगाविषयी जनजागृती करून त्यावर मात करणे अत्त्यंत गरजेचे आहे. १०० दिवस क्षयरोग मोहीम कार्यक्रमाची रुपरेषा यावेळी मांडण्यात आली. माइक्रो प्लानिंग आणि मॅपिंगच्या मदतीने क्षयरोग समूळ नष्ट करण्यात मदत होईल. यात जनभागीदारी देखील महत्वाची आहे असे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मोहिमेचा उद्देश व अति जोखमिचे गट जसे ६० वर्षावरील व्यक्ती, मधुमेह असणाऱ्या व्यक्ती, धुम्रपान करणाऱ्या व्यक्ती, यापूर्वी क्षयरोगाचा उपचार घेतलेल्या व्यक्ती, क्षयरुग्णाच्या संपर्कातील घरातल्या व्यक्ती, एच.आय.व्ही. बाधित व्यक्ती इत्यादी विषयी सविस्तर माहिती सांगितली.
क्षयरोगाविषयी लोकांमध्ये असणारा स्टिग्मा (stigma) कमी करणे आवश्यक आहे. आपण सर्वांनी कोरोनाचा जसा सामना केला तास क्षयरोगाचा समाना आपण सर्वांना करायचा आहे. तुम्हाला काही लक्षणे आढळल्यास क्षयरोगाची चाचणी करणे महत्वाचे असते. या १०० दिवसात आपण सर्व मिळून यावर मात करूया असे मेयो आरइएसपी मेडिकल विभाग प्रमुख डॉ. राधा मुंजे म्हणाल्या.
क्षयरोग असलेल्या रुग्णाकरिता पोषण आहार अत्यंत महत्वाचा आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे १४००० फूड बास्केट क्षयरोग असलेल्या रुग्णांना देण्यात आल्या, अशी माहिती शहर क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार यांनी दिली. यावेळी उज्वल पगारीया, पगारीया ग्रुप, नागपूर, सदर टीयु, पुरुषोत्तम भोसले सेवा फाउंडेशन, मेडीकल कॉलेज चौक, नागपूर, जीएमसी टीयु, आकाश सपेलकर, नानक धनवानी, सहयोग फाउंडेशन, शांती नगर टीयु, रावत, गरज फाउंडेशन, नायडू, सुद चॅरीटेबल फाउंडेशन, नरेंद्र जिचकार, सामाजिक कार्यकर्ता, चारुशिला रोहणे, सामान्य नागरीक, डॉ. राऊत (उमेश बाजुरकर), स्वर्गीय प्रभाकरराव दटके स्मृती सेवा संस्था, भास्कर पराते, (रुपाली दिपक पराते) समाजीक कार्यकर्ता, सुनिल अग्रवाल, माजी नगरसेवक, डॉ. ग्रिष्मा डिंग्रा रोटरी क्लब मेंबर, सदर टीयु, हरनीत सिंग सुरी, रोटरी क्लब मेंबर, महाल टीयु, मनीष सोनी, सोनी समाज मित्र मंडळ, राजेश अग्रवाल, सामान्य नागरीक, डॉ. प्रज्ञा गजभिये, मेडीकल ऑफीसर, डॉ. आंबेडकर हॉस्पीटल, डॉ. नाझीया ईरीयात, आरोग्य अधिकारी, डॉ. आंबेडकर हॉस्पीटल, डॉ. नमीता, आरोग्य अधिकारी , डॉ. आंबेडकर हॉस्पीटल, डॉ. नितीन शेंडे, आरोग्य अधिकारी, डॉ. आंबेडकर हॉस्पीटल यांना प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियनाअंतर्गत नागपूर शहरात निक्षय मित्र म्हणुन उत्कृष्ट सहयोग केल्याबाबत गौरविण्यात आले.
१०० दिवसीय क्षयरोग दुरीकरण मोहिम देशभरातील निवडलेल्या ३४७ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. यामध्ये नागपूर मनपाचा समावेश आहे. १०० दिवसीय क्षयरोग शोध मोहीमेमध्ये सर्व मनपाचे दवाखाने, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र याअंतर्गत येणारे जोखीमग्रस्त भागामध्ये सर्वेक्षण व क्षयरोगविषयक जनजागृती करण्यात येणार आहे. निक्षय शिबीर, अनाथाश्रम, वृध्दाश्रम, उद्योग संस्था, निवासी शाळा, कारागृह, येथे क्षयरोग तपासणी शिबिर व स्थलांतरीत, उच्च जोखीमग्रस्त भाग व वंचित घटक यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी मनपा स्तरावर नियोजन करण्यात आले आहे. सदर मोहिम राबविण्याकरिता लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते व इतर विभाग यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. डॉ. सदफ खतीब यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. संगीता शिंगने आणि उत्तम मधुमटके हे कार्यक्रमाचे समन्वयक होते.