नागपूर समाचार : हिंदू समाज बांगलादेशातील हिंदू, बौद्ध, जैनांवर होणारे हल्ले, हत्या, अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाजाचा मंगळवारी १० डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनी सहा विविध स्थानांहून बाईक रॅली, एक भव्य मोर्चा असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र- गोवा महामंत्री गोविंद शेंडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. रमेश मंत्री, भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष बंटी कुकडे, अमोल ठाकरे, विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांतमंत्री प्रशांत तितरे, निरंजन रिसालदार, रा.स्व. संघाचे महानगर संपर्क प्रमुख ब्रजेश मानस, राजू पवनारकर, अभाविपच्या शेजल पाटील यावेळी होते.
हिंदू समाजचा मोर्चा : हिंदू समाज सिरिया, फिलिपाईन्स वगैरे देशात अत्याचार होत असल्याचे कंठशोष करणार्या, ओरडून सांगणार्यांचा आवाज आज बांगला देशात अमानुष अत्याचार, मंदिरे, बुद्ध विहारांवर हल्ले होत असताना चुप का आहे, असा सवाल गोविंद शेंडे यांनी केला. गाजा पट्टीतील मुस्लिमांचा पुळका असलेले काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बांगला देशात हिंदूंवर अत्याचार होत असताना कुठे, असा सवाल बंटी कुकडे यांनी केला. सर्व हिंदूंनी जाती, पंथ, प्रांत, भाषा आदी भेद विसरून एकत्र राहण्याचे व मोठ्या प्रमाणात मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
मोर्चा व रॅली : हिंदू समाज मंगळवारी १० डिसेंबरला सहा बाईक रॅली व मोर्चा निघेल. दुपारी २ वाजता मध्य नागपुरातील बाईक रॅली बडकस चौकातून, पूर्व सतरंजीपुरा, उत्तर नागपुरातील कमाल टॉकिज चौक, पश्चिम नागपुरातील रामनगर व छावणी चौक, दक्षिण-पश्चिम नागपुरातील अजनी चौक, दक्षिण नागपुरातील बाईक रॅली सक्करदरा चौकातून निघेल. मध्य व पूर्व नागपुरातील बाईक रॅली टेकडी गणेश मंदिर, मानस चौक, उत्तर व पश्चिम नागपुरातील संविधान चौकात, दक्षिण-पश्चिम व दक्षिण नागपुरातील रॅली यशवंत स्टेडियममध्ये एकत्र होतील.
सर्वजण व्हेरायटी चौकाच्या दिशेने पायी मार्गक्रमण करतील. सुभाषचंद्र बोस, डॉ. मुंजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला तसेच व्हरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हारार्पण केले जाईल. तेथे दुपारी ४ वाजता सभा होईल. रा.स्व. संघाचे अ.भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर मार्गदर्शन करतील.