नागपूर समाचार : सिकलसेल आजार जनजागृती सप्ताह 17 डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये साजरा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था स्तरावर सिकलसेल आजाराची तपासणी व मार्गदर्शन शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी सिकलसेलची रक्त तपासणी जवळच्या आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येथे जाऊन करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी केले आहे.
जिल्ह्यात सन 2009 पासून एकूण 3 लाख 44 हजार 111 सिकलसेल तपासण्या झाल्या आहेत. त्यामध्ये 36 हजार 393 वाहक व 2 हजार 972 सिकलसेलग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. सर्व रुग्णाना मोफत औषधोपचार, रक्त पुरवठा व समुपदेशन करण्यात येते.
शासनाकडून सिकलसेल रुग्णांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत आर्थिक लाभ मिळतो. दहावी व बारावीमध्ये शिकणाऱ्या सिकलसेलग्रस्त विद्यार्थ्याला परीक्षेच्या वेळी प्रत्येक तासाला 20 मिनिट अधिकचा अवधी दिला जातो व उपचाराकरिता बस प्रवासात सवलत दिली जाते. सिकलसेल आजार हा अनुवांशिक असून आई-वडिलापासून अपत्यांना होतो. हा रक्त पेशीशी संबंधित आजार आहे.