भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची आक्रमक टीका
मुंबई समाचार : “ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले ते उद्धव ठाकरे आज हिंदुंच्या रक्षणाबद्दल बोलत आहेत.” उद्धव ठाकरे यांचं हिंदू प्रेम किती बेगडी होतं हे त्यांच्या अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात जनतेने पाहिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची लायकी नाही, अशी आक्रमक टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
बावनकुळे यांनी खडे बोल सुनावले. ते म्हणाले,” पालघरमध्ये झालेलले साधूंचे हत्याकांड आणि तुमची हिंदूविरोधी भूमिका महाराष्ट्राने बघितली आहे. बांगलादेशमधील हिंदूंच्या पाठीशी भाजप उभी आहे. त्याचसाठी केंद्र सरकारने ‘नागरिकत्व दुरूस्ती विधेयक’ मंजूर केले आहे. त्यावेळी तुम्ही मात्र काँग्रेसला घाबरून राज्यसभेत बोटचेपी भूमिका घेतली होती.” भाजपासाठी हिंदुत्ववाद हा राजकारणाचा विषय नाही तर श्रध्दा, प्राण आणि श्वास आहे, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.
यातूनच तुमची निष्ठा समजते
ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रखर हिंदुत्ववादी विचार सोडले. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांचे चिरंजीव प्रियांक खरगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेली टीका तसेच कर्नाटक विधानसभेतून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा काढण्याचा उद्दामपणा काँग्रेस नेते करत असताना अवाक्षर काढले नाही, यातूनच त्यांची हिंदुत्वाबद्दलची तथाकथित निष्ठा समजते, अशीही टीका बावनकुळे यांनी आपल्या ‘एक्स’वरील पोस्टमधून केली आहे.