नागपूर समाचार : महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ के. एच. गोविंद राज यांनी मंगळवारी (ता.१७) नागपूर महानगरपालिका आणि नागपूर स्मार्ट सिटीच्या विविध विकास प्रकल्पांची पाहणी केली. त्यांनी नागपूर स्मार्ट सिटीतर्फे नागपूर पोलीसांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘कमांड कंट्रोल सेंटर’ची सुद्धा पाहणी केली. याप्रसंगी नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल सूद गोयल, पोलीस उपायुक्त लोहित मतानी, डॉ. अश्विनी पाटील आणि मनपाचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वप्रथम डॉ गोविंद राज यांनी मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील सहाव्या माळ्यावर स्थित श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपेरेशन सेंटरची पाहणी केली. मनपा आणि नागपूर स्मार्ट सिटीतर्फे त्यांना सिटी ऑपेरेशन सेंटरमधून घनकचरा व्यवस्थापन, आपली बस, ‘इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनॅजमेन्ट सिस्टिम’ आणि नागरी समस्यांच्या संबंधात येणाऱ्या तक्रारींबद्दल करण्यात येत असलेल्या व्यवस्थापनाची माहिती दिली.
‘नागपूर सेफ अँड स्मार्ट सिटी प्रोजेक्ट’ अंतर्गत करण्यात येत असलेल्या विविध कामांची माहिती देताना नागपूर स्मार्ट सिटी ई गव्हर्नन्स विभागाचे महाव्यस्थापक डॉ. शील घुले यांनी सांगितले की, नागपूर शहरात ३६०० सीसीटीव्ही कॅमरे लावण्यात आले आहेत. सध्या काही कॅमरे विविध विकास प्रकल्प सुरु असल्यामुळे बंद आहेत. स्मार्ट सिटीतर्फे स्मार्ट पार्किंग, वायफायची सुविधा करण्यात आली आहे. अधिवेशन काळात गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी या कॅमेऱ्यांची मदत होते. तसेच महामेट्रो, मॉल्स आणि इतर बाजारपेठेतील ४००० कॅमरे सुद्धा यासोबत संलग्न करण्यात आले आहेत. नागपूर शहरात ३५० नवीन ठिकाणी २००० कॅमरे लावण्याची मागणी होत आहे, असेही डॉ. शील घुले यांनी सांगितले.
‘इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनॅजमेन्ट सिस्टिम’ बद्दल माहिती देताना अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर यांनी सांगितले की केल्ट्रॉन कंपनी या प्रणालीचे काम करीत आहे. पुढील वर्षी हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पाच्या सहाय्याने नागपूरची वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यात मोठी मदत होईल. या प्रसंगी त्यांना माहिती देण्यात आली की, घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे घरोघरी कचरा उचलणाऱ्या वाहनांची ट्रॅकिंग येथून केली जात आहे. तसेच आपली बसची ट्रॅकिंग, अग्निशमन विभागाच्या वाहनांची ट्रॅकिंग आणि सिवरेज नेटवर्क च्या कामाची माहिती प्रधान सचिव यांना देण्यात आली.
नागपूर स्मार्ट सिटीतर्फे नागपूर पोलीसांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘कमांड कंट्रोल सेंटर’ मध्ये अत्याधुनिक पद्धतीने गुन्हेगारांना पकडण्यासाठी उपयोगात येणाऱ्या ‘सिम्बा’ सॉफ्टवेअर ची देखील माहिती प्रधान सचिवांना देण्यात आली. नागपूर पोलीस आता आवाज, चेहरा यापासून सुद्धा गुन्हेगारांचा शोध घेऊ शकते, असे पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी सांगितले. याप्रसंगी मनपा उपायुक्त विजय देशमुख, डॉ. गजेंद्र महाले, स्मार्ट सिटीच्या कंपनी सचिव भानुप्रिया ठाकुर, कार्यकारी अभियंता राजेश दुफारे, राजेश राठोड, स्वप्नील लोखंडे व इतर उपस्थित होते.