■ नितीन गडकरी, संभाजी पाटील निलंगेकर, समीर कुणावार यांची उपस्थिती
नागपूर समाचार : विश्व वारकरी सेवा संस्थेतर्फे ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रस्तुत अभंगवारीत अवघी पंढरी अवतरल्याचा अनुभव शहरवासीयांनी घेतला. हजार वारकर्यांच्या समूहाने केलेले अभूतपूर्व सादरीकरण वाखाणण्यासारखे होते. ज्यांनी वारी केली आहे, त्यांना तर सध्या वारीत असल्याचा अनुभव आला, तर ज्यांनी अजूनपर्यंत वारी केलेली नाही, त्यांनी तर वारीत जायचेच, हे पक्के ठरवून टाकले, इतका जिवंतपणा प्रस्तुतीत होता.
वारीचा अनुभव घेण्याकरिता नागपूरकरांनी प्रचंड गर्दी केली होती. ‘ओम नमोजी आद्या’ने कार्यक्रमाची करण्यात आली. ‘रूप पाहता लोचनी,’ ‘तो हा विठ्ठल बरवा,’ ‘तुळशीहार गळा कासे पितांबर,’ ‘जय जय विठ्ठल रखुमाई’ ही ईश्वराची अनुभूती देणारी गाणी सादर झाली. २५० गायकांसह २ हजार वारकर्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला.
कार्यक्रमाला खासदार महोत्सवाला मूर्त रूप देणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संस्कार भारतीच्या प्रमुख कांचन गडकरी, आ. कुणावार, आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. प्रवीण दटके, आ. मोहन मते, उद्योजक अतुल गोयल, नितीन खारा, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे डॉ. मिश्रा, ज्ञानेश्वर रक्षक प्रामुख्याने उपस्थित होते. श्रीरामपंत जोशी महाराज, धर्मपुरीकर महाराज, अहेर महाराजांचा यावेळी सत्कार करण्यात आला.