■ कार्यपद्धती, विचारधारा, आणि समाजातील विविध प्रश्नांवर मार्गदर्शन
■ अजित पवार आणि त्यांच्या गटातील अनेक आमदार अनुपस्थित
नागपुर समाचार : नागपूरमध्ये विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महायुतीतील आमदारांसाठी बौद्धिकाचे आयोजन केले होते. आज रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती स्थळी या बौद्धिकाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार देखील हजर होते.
यावेळी शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांनी संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. राष्ट्रवादीचे तुमसरचे आमदार राजू कारेमोरे देखील स्मृती मंदिरात दाखल झाले. मात्र अजित पवार आणि त्यांच्या गटातील अनेक आमदार आले नव्हते.
संघाकडून भाजपाच्या सहकारी पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना निमंत्रण देण्यात आले. बौद्धिकाच्या माध्यमातून आमदारांना संघाच्या कार्यपद्धती, विचारधारा, आणि समाजातील विविध प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यात आले
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘बौद्धिक’ या उपक्रमाद्वारे संघाचे विचार, तत्त्वज्ञान, आणि भारताच्या सांस्कृतिक वारशावर चर्चा केली जाते. या व्याख्यानांमध्ये संघाचे उद्दिष्ट, हिंदू संस्कृतीचे महत्व, आणि राष्ट्रवाद याविषयी माहिती दिली जाते.
संघाच्या या बौद्धिकाला शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कोणत्या आमदारांनी हजेरी लावली आणि कोणते गैरहजर राहिले, याकडे सर्वांचे लक्ष होते.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थितीत दर्शवली. रेशीम बागेत याआधी सुद्दा आल्याचे त्यांनी सांगीतले. संघाच्या शाखेतून माझी सुरुवात झाली आहे. संघाची शिकवण जोडणारी आहे तोडणारी नाही. मुख्यमंत्री देखील संघाचे सदस्य आहे. राष्ट्रसेवेत संघाचे योगदान नाकारता येत नाही. संघ परिवार आणि शिवसेनेचे विचार एकच असल्याचे शिंदे म्हणाले.