नागपूर समाचार : सिव्हील लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालयात साकारलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’वर आधारीत महारांगोळी विधीमंडळ अधिवेशनानंतरही सर्व सामान्यांना पाहण्यासाठी खुली ठेवण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय उपाध्ये यांनी दिली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने मुख्यमंत्री सचिवालय परिसरात विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या विविध विभागांची शिबिर कार्यालये उभारण्यात आली आहेत. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेवर महारांगोळी याच परिसरात मुख्यमंत्री कार्यालयाच्या मागील भागात साकारण्यात आली आहे. 12 सेमी उंचीच्या डायसवर 288 फुट आकाराची (12 X24 फुट) ही सुबक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
येथे लाडक्या बहिणीची प्रातिनिधिक प्रतिकृती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिकृती रेखाटण्यात आल्या असून खास शैलीतील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही खास शब्द रचनाही रेखाटण्यात आली आहे.
प्रसिद्ध रांगोळी कलावंत सुनिल तरारे यांच्या नेतृत्वात नागपूर व यवतमाळ येथील एकूण पाच कलाकारांनी 60 किलो रांगोळीद्वारे ही महारांगोळी साकारली आहे.