- Breaking News, Meeting, नागपुर समाचार

नागपुर समाचार : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनख्यांसह शिवशस्त्र शौर्य प्रत्यक्ष पाहण्याची नागपुरकरांना अपूर्व संधी

▪️ जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीत नियोजन 

▪️ फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार शिवशस्त्र शौर्य प्रदर्शनाचे उद्घाटन

▪️ ब्रीटीश सरकारकडून महत् प्रयासाने महाराष्ट्र शासनाने प्राप्त केली ही शिवनखे

नागपूर समाचार : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे मापदंड म्हणून आपण ज्या वाघनख्यांकडे पाहतो त्या वाघनखांसहित शिवशस्त्रांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी नागपूर येथे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून उपलब्ध होत आहे. महत् प्रयासाने ही वाघनखे भारत सरकार व महाराष्ट्र शासनाने इंग्लडकडून निर्धारित कालावधीसाठी प्राप्त केली आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासातील शौर्याची ही गाथा या वाघनख्यांच्या माध्यमातून येथील युवा पिढीला, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, संशोधकांना व समस्त इतिहास प्रेमींना प्रत्यक्ष अनुभवता यावी यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.

मध्यवर्ती पुरातत्व वस्तुसंग्रहालय येथे आयोजित होणाऱ्या या प्रदर्शनाच्या पुर्व आढाव्याची बैठक आज जिल्हाधिकारी तथा शिवशस्त्रशौर्य समितीचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस मनपा अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, पुरातत्व व वस्तुसंचानालये संचानालय विभागाचे संचालक नंदा राऊत, उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, पोलीस उपायुक्त राहुल मदने, मध्यवर्ती संग्रहालयाचे अभिरक्षक मयूर खडके यांच्यासह समितीमधील इतर सदस्य उपस्थित होते.

येत्या 1 फेब्रुवारी रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन नियोजित आहे. सूमारे आठ महिने हे प्रदर्शन मध्यवर्ती संग्रहालय, नागपूर येथे सर्वांसाठी खुले राहील. या वाघनख्यांसोबत विविध शिवशस्त्र व त्याबाबतची माहिती मिळेल. नागपूर जिल्ह्यासह इतर ठिकाणाहून विविध शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमधून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी यावेत यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या. 

महाराष्ट्र शासनाने जिल्हास्तरीय समिती गठित केली असून यात जिल्हाधिकारी हे अध्यक्ष तर पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, शिक्षणाधिकारी, माहिती व जनसंपर्क अधिकारी हे सदस्य तर सदस्य सचिव म्हणून अभिरक्षक, मध्यवर्ती संग्रहालय हे आहेत.

जिल्ह्यातील प्रत्येक शाळा व महाविद्यालयांच्या सहलींचे नियोजन

जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रदर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी जिल्हा परिषद, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, शैक्षणिक संस्था, इतिहास संशोधन मंडळे, सेवाभावी संस्था यांच्या समन्वयातून अधिकाधिक संख्येने हे प्रदर्शन यशस्वी नियोजन करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

एैतिहासिक जागरासाठी इतिहास तज्ज्ञांची होणार व्याख्याने

प्रदर्शन कालावधीत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना अचूक उत्तरे मिळावीत, एैतिहासिक संदर्भ त्यांना व्यवस्थित कळावेत यासाठी प्रदर्शन कालावधीत निवडक विद्यालये, महाविद्यालये व इतर तालुक्यांच्या ठिकाणी इतिहास तज्ज्ञांचे व्याख्याने आयोजित करण्याची निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *