- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : भजन मंडळांच्या माध्यमातून शहरात आध्यात्मिक वातावरण – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

■ संस्थांना भजन साहित्याचे वितरण

नागपूर समाचार : नागपूर शहरातील शेकडो भजन मंडळांच्या माध्यमातून शहरात आध्यात्मिक वातावरणाची निर्मिती होत आहे. यातून पुढच्या पिढीमध्ये चांगले संस्कार रुजविण्याचे महत्त्वाचे कार्य होत आहे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज येथे व्यक्त केले. नागपुरातील साडे तीनशेच्या वर मंडळांना मंगळवारी (दि. २४ डिसेंबर) ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते भजन साहित्याचे (तबला, हार्मोनिअम व टाळ) वितरित करण्यात आले.

ईश्वर देशमुख कॉलेजच्या मैदानावर आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला आमदार कृष्णा खोपडे, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे राजेश बागडी, गौरीशंकर पाराशर, दीपक खिरवाडकर, प्रमोद पेंडके, बाळ कुळकर्णी यांच्यासह इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. शहरात आध्यात्मिक वातावरण कायम राहावे, या उद्देशाने नागपुरातील भजन मंडळांना साहित्य वाटप केले जात असल्याचे ना. श्री. गडकरी म्हणाले. यातून एक चांगले परिवर्तन शहरात बघायला मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

‘सांस्कृतिक महोत्सवांतर्गत भक्ती महोत्सवाचे आयोजन करून जास्तीत जास्त नागपूरकरांना सामावून घेतले गेले. याशिवाय खासदार भजन स्पर्धाही आयोजित करण्यात येते. आपल्या आध्यात्मिक परंपरेबद्दल तरुण पिढीमध्ये गोडी निर्माण व्हावी; साहित्य मिळाल्यानंतर भजन मंडळांमधील उत्साह वाढीस लागावा आणि त्यांच्या जीवनात भजनाच्या माध्यमातून आनंद निर्माण व्हावा, हा उद्देश आहे,’ असेही ना. श्री. गडकरी म्हणाले. 

भजन साहित्य स्वीकारताना मंडळाच्या सदस्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव बघायला मिळाले. त्याचवेळी काही मंडळे साहित्य मिळाल्यावर अतिशय आनंदाने विठु नामाचा गजर करीत कार्यक्रम स्थळाबाहेर पडली. यावेळी नागपुरातील भजन मंडळाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच माजी नगरसेवक आणि नगरसेविकांची आवर्जून उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *