नागपूर समाचार : सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलनाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांपर्यंत राष्ट्रभक्तीला घेऊन आपल्या परीने योगदान देण्याचा, अप्रत्यक्ष सहभाग घेण्याचा संस्कार पोहचविणे शक्य होते. विद्यार्थ्यांनी किती निधी दिला हे महत्वाचे नसून त्या-त्या संस्थांनी, शाळांनी विद्यार्थ्यांपर्यंत सैनिकांच्या योगदानाला कसे पोहचविले हे अधिक महत्वाचे आहे. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रासह, शासकीय अधिकारी-कर्मचारी, उद्योजक, व्यापारी यांच्या इतकाच मुलांचा सहभाग अधिक महत्वाचा आहे. त्यादृष्टीने शिक्षण विभागाने सैनिकांप्रती कृतज्ञताभाव वृध्दींगत व्हावा यासाठी परिपूर्ण नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सेना मेडलने सन्मानित मेजर आनंद पाथरकर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलनाचा(2024-25) शुभारंभ करण्यात आला. गतवर्षी नागपूर जिल्ह्याला सर्वांच्या योगदानातून ध्वजनिधी संकलनात राज्यात दुसरा क्रमांक प्राप्त झाला. येथील औद्योगिक क्षेत्र, मिहान, विविध महामंडळे, उद्योजक, दाते यांच्या माध्यमातून राज्यातून प्रथम क्रमांकाचे उद्दिष्ट यावर्षी साध्य करु असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झालेल्या समारंभात गतवर्षी ध्वजनिधी संकलनात अधिक योगदान दिले त्या विभाग प्रमुखांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सूरजकुमार रामोड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, सहजिल्हा निबंधक टी.एल. गंगावणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार, प्राथमिक शिक्षणाधिकारी सिध्देश्वर काळुसे, जिल्हा खनिकर्म अधिकारी अतुल दोड, नगर भूमापन अधिकारी प्रशांत हांडे यांना त्यांच्या योगदानाबद्दल गौरविण्यात आले.
याचबरोबर माजी सैनिकांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात साध्य केलेल्या गुणवत्तेबद्दल 20 हजार रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यात आर्यन अविनाश मेश्राम, प्रांजली श्रीकृष्ण बावणे, किर्ती गंगाधर गोटीपट्टी यांनी इयत्ता दहावीमध्ये अनुक्रमे 97 टक्के, 91 टक्के व 90 टक्के गुण साध्य केल्याबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात आले. गायत्री शरद कुबडे हीने बारावीमध्ये 89.80 टक्के गुण प्राप्त केले. जान्वी कालकाप्रसाद सुर्यवंशी या विद्यार्थीनी 86.67 टक्के गुण साध्य केले. चैतन्य रविशंकर खनगई या पाल्याने कोझीकोडे येथे आयआयटी मध्ये प्रवेश मिळविला. याला 1 लाख रुपयांचा धनादेश व प्रशस्तीपत्र देण्यात आले. माजी सैनिक, हवालदार रत्नाकर वामनराव ठाकरे यांनी केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल त्यांना 25 हजार रुपयांचा धनादेश व प्रशस्तीपत्र देण्यात आले. सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सत्येंद्र चवरे व इतर अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन सत्येंद्र चवरे यांनी केले.