■ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मौजा-कर्दुळ (घोट) येथे उत्साहात साजरी
गडचिरोली समाचार : घोट:स्त्री शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाचा मंत्र देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मौजा-कर्दुळ (घोट), ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथे आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते झाले. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करण्यात आले.
स्त्री मुक्तीचा सन्मान आणि शिक्षणाचा संदेश
उद्घाटन प्रसंगी अशोकजी नेते यांनी सावित्रीबाईंच्या सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाचा गौरव करत, त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण आणि स्वातंत्र्याचा अधिकार मिळवून दिला. त्यांचे विचार आजच्या काळातही प्रेरणादायी आहेत. नव्या पिढीने त्यांच्या विचारांवर चालत सक्षमीकरणाच्या दिशेने पाऊले उचलावी.”
नेते यांनी राष्ट्रीय बालिका दिनाची भावना व्यक्त करत, मुलींना शिक्षण, स्वावलंबन, आणि समान हक्कांसाठी प्रयत्नशील राहण्याचा संदेश दिला. त्यांनी गावातील समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन देत, त्या सोडवण्यासाठी आपल्या प्रयत्नांची ग्वाही दिली.
यावेळी प्रामुख्याने या जयंतीच्या कार्यक्रमाला जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेवराव सोनटक्के, अँड. रत्नघोष ठाकरे, सरपंच रूपाली ताई दुधबावरे, माजी पंचायत समिती सदस्य विलास गण्यारपवार, आदिवासी नेते विलास उईके, ग्रामपंचायत सदस्या वनिता पोरेड्डीवार आणि रेखा संगीडवार, पोलीस पाटील हरिदास चलाख, अशोकजी गुरुनुले, आनंदजी मोहुरले, पांडुरंग लोहबरे, महेंद्र चौधरी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
घोट आणि मौजा-कर्दुळ येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून सावित्रीबाईंच्या विचारांना उजाळा दिला. कार्यक्रमाने सामाजिक बांधिलकीचे नवे विचार प्रस्थापित केले आणि स्त्री मुक्तीचा सन्मान केला.