▪️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कृतीगट
नागपूर समाचार : संपूर्ण विदर्भासह मध्य भारताच्या औद्योगिक विकासासमवेत रोजगार निर्मितीला चालना देणाऱ्या महत्वाकांक्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या विस्तारीकरणााला आता गती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कृतीगट तयार करण्यात आला असून प्रलंबित कामासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत प्रशासकीय पातळीवरचे उर्वरीत कामे मुदतीपुर्वी पुर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा मिहान इंडिया लिमिटेचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.
त्यांच्या अध्यक्षतेखाली आज विमानतळ विस्तारीकरणाबाबत मिहान इंडियाच्या कार्यालयीन सभागृहात व्यापक बैठक झाली. या बैठकीस मिहान इंडिया लिमिटेडचे नियोजन सदस्य तथा संचालक अनिलकुमार गुप्ता, जीएमआर गृपचे कार्यकारी संचालक एस.जी.के. किशोर, भारतीय वायुसेनेचे स्टेशन कमांडर शिव कुमार, पोलीस उपायुक्त लोहित मतानी, वरिष्ठ विमानतळ संचालक अबिद रुही, एमएडीसीचे प्रकाश पाटील, मुख्य अभियंता एस.के. चटर्जी, भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या समन्वय प्रमुख लॅली मेरी फ्रन्सीस, महानगर पालिकेचे वरिष्ठ अधिकारी प्रमोद गावंडे, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत असलेले क्षेत्र मिहान इंडिया लिमिटेड कंपनीला हस्तांतरीत करण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाची मान्यता लवकर मिळावी यादृष्टीने मंजूरी दिल्या प्रमाणे परिपुर्ण प्रस्ताव सर्व संबंधित यंत्रणांकडून तपासून पाठविला जात आहे. याचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. विमानतळ विस्तारीकरण प्रकल्पांतर्गत अधिसूचीत असलेल्या क्षेत्रातून खाजगी वाहतूक पुर्णत: बंद करण्याचा या बैठकीत निर्णय घेण्यात आला. महानगर पालिकेतर्फे सद्यस्थितीत सुरु असलेली आपली बस सेवा आता या अधिग्रहीत जागेतून जाणार नाही. महानगर पालिकेला याबाबत स्पष्ट आदेश देण्यात आले. भारतीय वायुसेनेच्या स्थलांतरीत जागेवर उपलब्ध करुन द्यावयाच्या सुविधा व पोच मार्गाचे काम तातडीने सुरु करण्याबाबतही या बैठकीत कालमर्यादा आखून दिली आहे.
संपूर्ण विमूानतळाच्या विकासाच्या दृष्टीने एकदा काम सुरु केल्यानंतर पुढे कुठल्याही प्रकारची अडचण जाऊ नये यादृष्टीने ज्या काही बाबी प्रलंबित आहेत त्याची एक महिन्याच्या आत पुर्तता करुन कायदेशिर बाबी पुर्ण करण्याचे निर्देश डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. विस्तारीत विमानतळ प्रकल्पाच्या कामामध्ये अडथळा ठरणाऱ्या सूमारे एक किलोमिटर लांबीच्या उच्चदाब विद्युत वाहिनीचे स्थलांतर कामाला अधिक गती देऊन हे काम कालमर्यादेत पुर्ण करु असे अधीक्षक अभियंता अमित परांजपे यांनी सांगितले. शिवणगाव येथील जे काही व्यक्तींचे अतिक्रमण आहे ते गतीने काढण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. पर्यायी गावठानात रितसर जागा बहाल करुनही जे लोक स्थलांतरीत झाले नाहीत त्यांचे तत्काळ स्थलांतर केले जाणार आहे. सर्व विभाग प्रमुखांची या प्रकल्पाला गती देण्यासाठी महिन्यातून किमान दोन वेळा व गरज पडेल तशी बैठक बोलावून तत्काळ निर्णय घेतले जातील, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले.