- Breaking News, उद्घाटन, नागपुर समाचार

नागपूर समाचार : ग्रामायण उद्यम प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन; नोकरी मागण्यापेक्षा उद्योगातून मालक बना

 नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शन बघण्याचे आवाहन

नागपूर समाचार ‌: देशाच्या समृद्धीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देणारे ६वे ग्रामायण उद्यम प्रदर्शन १६ ते २० जानेवारी २०२५ दरम्यान नागपुरात आयोजित करण्यात आले आहे. “नोकरी मागण्यापेक्षा मालक बना आणि इतरांना नोकऱ्या द्या” हा प्रेरणादायी संदेश या प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्यात येत आहे. ग्रामायनचे हे प्रदर्शन बळ देणारं असून, यातून उद्योजकांना नवीन दिशा लाभेल, असा विश्वास प्रदर्शन उद्घाटनाला तिन्ही अतिथीनी व्यक्त केला. सातत्याने असा उपक्रम राबवणे अतिशय कठीण असतं तर त्यामुळे हा उपक्रम सातत्याने राबवत असल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले आणि मोठ्या संख्येने लोकांनी हे प्रदर्शन पाहावं, असे आवाहन केले. 

हे प्रदर्शन अमृत भवन, आंध्र असोसिएशन परिसर, उत्तर अंबाझरी मार्ग, झाशी राणी चौकाजवळ आयोजित करण्यात आले असून ते दिवसभर खुले राहील.

१६ जानेवारी रोजी पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध उद्योजक मा. श्री किशोर राठी, विठोबा दंतमंजनचे प्रमुख मा. श्री सुदर्शन शेंडे, व्हीआयए सीएसआर फोरमचे अध्यक्ष मा. श्री गिरधारी लाल मंत्री, ग्रामायणचे अध्यक्ष अनिल सांबरे आणि सचिव संजय सराफ उपस्थित होते.

२०१२ पासून ग्रामीण भागातील उपक्रम, पर्यावरणपूरक प्रकल्प आणि सामाजिक सेवेत सक्रिय असलेल्या ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे हे प्रदर्शन भरवले जाते. प्रदर्शनात ग्रामीण व स्थानिक उत्पादने, सेंद्रिय शेतीतील उत्पन्न, पारंपरिक वस्तू, बचत गटांचे उपक्रम, आणि स्वनिर्मित वस्तूंचा समावेश आहे.

याशिवाय कौशल्य विकास कार्यक्रम, नाविन्यपूर्ण स्पर्धा, CSR प्रकल्प आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले गेले आहे. कला दालनात बांबू आर्ट, गोंडी आर्ट, मातीच्या कलाकृती, आणि कचऱ्यातून तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन विशेष आकर्षण ठरत आहे. ई-वेस्ट कलेक्शन प्रकल्पांतर्गत जुने कपडे आणि साड्या गोळा करून पिशव्या तयार केल्या जातील. सरकारी योजना व उपक्रमांची माहिती देणारे स्टॉल्स इथे आहेत. 

प्रास्ताविक डॉ. चंद्रकांत रागीट यांनी केले, तर आभार प्रदर्शन मिलिंद गिरीपुंजे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन नरेंद्र गिरीधर यांनी केले.

स्वतःचे उद्योग स्थापन करून इतरांना रोजगार द्या

उद्घाटन सोहळ्यात बोलताना, मा. श्री गिरधारी लाल मंत्री म्हणाले, “सर्वांना नोकरी मिळेलच असे नाही, परंतु ग्रामीण भागातील उत्पादकांना समर्थन दिल्यास ते स्वतःचे उद्योग स्थापन करून इतरांना रोजगार देऊ शकतील. यामुळे शेतीमाल धारकांनाही फायदा होईल, आणि शेतकरी आत्महत्या थांबवण्यात यश मिळेल.”

ग्रामीण भागातील लोकांना मोठे व्यासपीठ

सुदर्शन शेंडे म्हणाले, “ग्रामायण हे नावच खूप अर्थपूर्ण आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना मोठा व्यासपीठ मिळत आहे, जे खूप महत्त्वाचे आहे. ग्रामायण एक्सपोला मनःपूर्वक शुभेच्छा!”

ग्रामीण उद्योगातून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करा

किशोर राठी यांनी ग्रामीण उद्योगांना चालना देण्याचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, “आत्मनिर्भर भारताचे स्वप्न तेव्हाच साकार होईल जेव्हा ग्रामीण उद्योग फुलतील. प्रदर्शनातून ग्रामीण उद्योजकांना आत्मविश्वास आणि नवीन दिशा मिळते.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *