▪️ बनाऍ जीवन प्राणवान या पुस्तकाचे प्रकाशन
▪️ श्रीमद जगदगुरु शंकराचार्य कूडली श्रृंगेरी महासंस्थानचे 72 वे पीठाधीश श्री श्री अभिनव शंकर भारती महास्वामी जी यांची विशेष उपस्थिती
नागपूर समाचार : हजारो वर्षांपासून गंगेचा वाहत आलेला प्रवाह दररोज नित्य नुतन भासतो. सनातन विचार हा गंगेच्या प्रवाहासारखा निर्मळ असून यात पुरातन व नित्य नुतनतेचा संगम आहे. आपण जेव्हा गंगेच्या धारेत जातो तेव्हा तेवढीच शुध्दता व तजेलतेची अनुभूती आपण घेतो. आपल्या संस्कृतीतून, परंपरेतून आलेली जी मूल्य आहेत, जे विचार आहेत, ज्या चेतना आहेत त्या पुर्नस्थापित करण्याचे कार्य मुकुल कानिटकर सारखे व्यक्तिमत्व करत आहेत. त्यांनी लिहिलेले “बनाऍ जीवन प्राणवान” हे पुस्तक त्याचेच द्योतक आहे, असे गौरोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
मुकुल कानिटकर यांनी लिहिलेल्या “बनाऍ जीवन प्राणवान” या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित या कार्यक्रमास श्रीमद जगदगुरु शंकराचार्य कूडली श्रृंगेरी महासंस्थानचे 72 वे पीठाधीश श्री श्री अभिनव शंकर भारती महास्वामी जी, लेखक मुकुल कानिटकर, प्रकाशक देवेंद्र पवार व मान्यवर उपस्थित होते.
आपल्या देशाला एक महान परंपरा लाभली आहे. हजारोवर्षांपासून प्रगल्भतेने सिध्द असलेल्या संस्कृतीवर आपला देश उभा आहे. आपली सिंधु संस्कृती याचे दर्शन घडवते. सूमारे 9ते 10 हजार वर्षांपूर्वी असलेली सभ्यता आपण पहातो. याचे अवशेष आजही आपल्याला आढळतात. परिपूर्ण नगराचे स्वरुप त्याचे अवशेष आपण पहातो. पाश्चिमात्यांकडे ज्या गोष्टी नव्हत्या त्या आपल्याकडे होत्या. समृध्दीसह विचार, विवेक, परंपरा, सभ्यता याचा समृध्द वारसा आपल्याकडे त्या कालापासून आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
या समृध्द परंपरेला इंग्रजांनी डिलीट करण्याचा प्रयत्न केला. याला छेद कसा देता येईल यासाठी इथल्या परंपरांवरही त्यांनी घाला घातला. आपण समृध्द होतो म्हणून आपल्यावर अनेक आक्रमण झाली. जगातील व्यापारात आपली हिस्सेदारी ही त्या काळी तीस टक्क्यांपेक्षा अधिक होती. जगाच्या व्यापारात आपला जीडीपी हा 28 ते 29 टक्के एवढा होता असे प्रशांत पोळ यांनी विविध संदर्भ देऊन याची मांडणी केली आहे. आपल्या स्थापत्य शास्त्रात सांडपाणी व्यवस्थापनापासून सर्वच बाबी होत्या. ही समृध्दता इथल्या परंपरेतून, इथल्या मूल्यातून, सनातन जीवनशैलीतून विकसित झालेली आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
आपल्या सभ्यतेला, परंपरेला शाश्वत मूल्यांना जपत यातील काही मूल्य काळाच्या परिघावर तपासून त्याला नव्या स्वरुपात स्वीकारण्याचे धैर्य भारतीयांनी दाखविले आहे. या सांस्कृतिक वारसामध्ये, विचारात, मूल्यांमध्ये विज्ञाननिष्ठता आहे हे आपण विसरता कामा नये. संपूर्ण जगावर राज्य करण्याची भूमिका आपल्या संस्कृतीची नसून आपल्या विचारांचे, सभ्यतेचे अनुकरण सर्वत्र व्हावे, यातून मानवता वाढावी ही शिकवणूक आपली परंपरा देते असे त्यांनी स्पष्ट केले. यादृष्टीने मुकुल कानिटकर यांचे हे पुस्तक नव्या पिढीपर्यंत सशक्तपणे पोहचणे अत्यंत आवश्यक आहे. ती जबाबदारी आपली असून यासाठी प्रत्येक जण याला प्रवाहित करतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
सनातन परंपरा ही विवेकाच्या विचारातून, संवेदनेतून आलेली आहे. ज्यांनी धर्मशास्त्र वाचले नाहीअशा अनेक लोकांच्या वर्तनात या सभ्य संस्कृतीचा अंश पोहचलेला आहे. एखाद्या परक्या ठिकाणी, नवीन गावात जर आपण जाऊ तर त्या ठिकाणची आपली माता बहीण आपल्याला हातपाय धुण्यास सांगते. याचा अर्थ ती आपल्याला जेवनाला निमंत्रण देत असते. जेवणाअगोदर हातपाय धुण्याची ही कृती विज्ञाननिष्ठेच्या पूढे जाणारी असल्याचे श्रीमद जगदगुरु शंकराचार्य कूडली श्रृंगेरी महासंस्थानचे 72 वे पीठाधीश श्री श्री अभिनव शंकर भारती महास्वामी जी यांनी आपल्या आशिर्वादपर मार्गदर्शनात सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाशक देवेंद्र पवार यांनी केले. भारतातील लहानातली लहान बाब एक अनुभूती आहे. त्यात ज्ञान आहे. दगडात सुध्दा प्राण असतात ही भावना त्यातील शक्तीला, सभ्यतेला जपणारी असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक बाबी आपल्याला विनासायास परंपरेतून मिळाल्या. त्याचे कशात मोल करता येणार नाही असे मुकुल कानिटकर यांनी सांगितले.