■ कलायोगी खर्डेनवीस दाम्पत्याचा सन्मान
नागपूर समाचार : पं. श्यामसुंदर खर्डेनवीस यांनी शास्त्रीय संगीतासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांनी शास्त्रीय संगीतातील नवीन पिढीला संस्कारित केले. अनेक उत्तम शिष्य घडवले. त्यामुळे त्यांचा सन्मान हा संगीत क्षेत्रात आराधना करणाऱ्या एका समर्पित कलावंताचा सन्मान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (रविवार) येथे व्यक्त केले.
उपासक, गायक व प्रचारक गुरुवर्य पं. श्यामसुंदर खर्डेनवीस व त्यांच्या सुविद्य पत्नी लेखिका, गायिका व अभिनेत्री शोभना चिकेरूर-खर्डेनवीस या कलायोगी दाम्पत्याचा सन्मान सोहळा पर्सिस्टंट सभागृहात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन पं. श्यामसुंदर खर्डेनवीस सन्मान सोहळा समिती, आप्त व शिष्य परिवार तसेच वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेच्या संगीत विभागातर्फे करण्यात आले. यावेळी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे, वनराई फाउंडेशनचे विश्वस्त गिरीश गांधी आदींची प्रमुख उपस्थिती होती. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘विदर्भात शास्त्रीय संगीतात खर्डेनवीस यांनी अनेक वर्ष योगदान दिले. त्यांनी उत्तम शिष्य तयार केले. संगिताच्या साधनेद्वारे नागपूर व विदर्भाचे नाव मोठे केले. कठीण परीश्रम व सरावाशिवाय हे शक्य नाही. त्यांनी नवीन पिढीतील शास्त्रीय गायकांना संस्कारित केले. त्यांना प्रेरणा दिली. त्यामुळे त्यांचं मोठं योगदान आहे.’ नागपूर महाविद्यालयाचा एकेकाळी खूप लौकीक होता. यामाध्यमातून अनेक प्रतिभावान साहित्यिक, लेखक, संगीतकार, कवींनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात छाप पाडली. त्यात पं. खर्डेनवीस यांचा आवर्जून समावेश होतो, असंही ना. श्री. गडकरी म्हणाले.