- Breaking News, उद्घाटन, नागपुर समाचार

नागपुर समाचार : पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी संशोधकांचे योगदान व नवतंत्रज्ञानाचा अधिक वापर महत्वाचा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

नागपूर समाचार : ग्रामीण भागाला सावरणाऱ्या शेतीपुरक पशु-पक्षी पालन, मत्स्यव्यवसाय उद्योगाला भविष्यात जर अधिक शाश्वत करायचे असेल तर हवामान बदलाचा विचार करुन प्राण्यांच्या पोषक अन्नद्रव्याचे काटेकोर नियोजन करणे नितांत आवश्यक आहे. याचबरोबर ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना अन्न सुरक्षिततेसह शेतीपुरक उद्योग व्यवसायातून चांगल्या उत्पन्नाची संसाधने अधिक भक्कम करण्यासाठी संशोधकांनी पुढे यावे असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. 

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत आयोजित जागतिक पशु आहार शास्त्र परिषदेच्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या रजत जयंती सभागृहात आयोजित या समारंभास पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., भारतीय कृषी अनुसंसाधन परिषदेचे महासंचालक डॉ. हिमांशु पाठक, पशुविज्ञान शाखेचे उपमहासंचालक डॉ. राघवेंद्र भट्ट, कुलगुरु डॉ. नितीन पाटील, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ. प्रविणकुमार देवरे व ज्येष्ठ संशोधक उपस्थित होते. 

पशुधन, वनसंवर्धन, पर्यावरण आणि शाश्वत जीवनशैलीबाबत भारतीय संस्कृतीने आपल्याला एक अमूल्य देणगी दिली आहे. आपल्या ईश्वरांनीही आपले वाहन पशुधनातून घेतले आहे. याच बरोबर पक्ष्यांनाही सन्मान दिला. पुर्वापार चालत आलेल्या परंपरा व ज्ञानाच्या आधारावर शेतीला पशुधनाची जोड देत यातून अतिरिक्त उत्पादकता आपल्या पुर्वजांनी घेऊन दाखविली. या क्षेत्रातील संशोधकांनी कालपरत्वे दिलेल्या योगदानाच्या साहाय्याने प्रगतीचा एक मोठा पल्ला आपण गाठू शकलो. आजच्या घडीला दुधाच्या उत्पादनात आपण जगात प्रथम क्रमांकावर आहोत. अंडी उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहोत. ग्रामीण भागाला विकासाची नवी दिशा देण्याचे सामर्थ्य पशुवैद्यकीय शास्त्रात असल्याचे त्यांनी सांगितले.

उपलब्ध असलेल्या साधनसंपत्तीत वाढत्या लोकसंख्येला पुरेल एवढे दुध, मांस, अंडी उपलब्ध व्हावेत, यातील पोषण मुलद्रव्य वाढण्यासह पर्यावरणातील संतुलनही राखले जावे यादृष्टीने आयोजित जागतिक पशु आहार शास्त्र परिषद महत्वाची आहे. या निमित्ताने आपण सर्व संशोधक एकत्र येऊन या क्षेत्राला नवी दिशा द्याल याची खात्री असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. 

मत्स्योत्पादन क्षेत्रातही आज अनेक संशोधने झाली आहेत. जनावरांच्या चाऱ्याच्या व्यवस्थापनापासून ते मत्स्य बीजोत्पादन, त्यांचे वजन, त्यांना अधिक पौष्टीक करणे यासह जलव्यवस्थापन असे अनेक क्षेत्र संशोधकांसाठी खुले आहेत. दुधाच्या गुणवत्तेपासून गरजेनुरुप उपलब्धतेपर्यंत अनेक क्षेत्रात संशोधक योगदान देत आहेत. या क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्यासह चांगल्या बदलासाठी आपण सर्व सिध्द होऊ यात, असे त्या म्हणाल्या. 

आजवरच्या प्रशासकीय सेवेतील हा माझा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. याच ज्ञानशाखेत माझे शिक्षण झाले असून इथे गुरुजनांच्या उपस्थितीत मला सहभागी होता आले, या शब्दात पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सर्व संशोधकांच्या योगदानातून एक उज्ज्वल मार्ग या परिषदेतून मिळेल, असे त्यांनी सांगितले. कुलगुरु डॉ. नितीन पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात या परिषदेचे महत्व विषद केले. पर्यावरणाच्या संतुलनासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. भविष्यात असणारी मागणी लक्षात घेता या क्षेत्रात मोठी संधी आहे. विद्यापीठातील संशोधन ग्रामीण भागातील शेवटच्या टोकावर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी विद्यापीठ कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले. या समारंभात ज्येष्ठ शास्त्रज्ञांचा गौरव करण्यात आला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *