▪️ पोलिस उपमहानिरिक्षक डॉ. दिलीप भुजबळ, पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचेसह माजी आमदार तिमांडे, ऍड. सुधिर कोठारी यांची उपस्थिती
▪️ पोलिस दलाच्या वतीने शहरात लावण्यात आले ५९ कॅमेरे
हिंगणघाट समाचार : राज्य सरकारचा गृह विभाग तसेच जिल्हा पोलिस दलाच्या संयुक्त प्रयत्नामुळे शहरात अद्ययावत असा सीसी टीव्ही नियंत्रण कक्ष अस्तित्वात आला असून या प्रणालीअंतर्गत शहरात ५९ संवेदनशील ठिकाणी कॅमेरे लागले आहेत, जिल्हा नियोजन समितीअंतर्गत शासनाने या करीता २ कोटी ५४ लाख रुपयांचा निधी दिला असून यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा दर्जा सुधारणार असून पोलिस विभागाला गुन्हेगारीवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येणार असल्याचे प्रतिपादन आ. समिर कुणावार यांनी केले. ते काल दि.२५ रोजी स्थानिक पोलीस ठाण्याचे परिसरात आयोजित अद्यावत अशा सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचे उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल असून, या सुविधेमुळे डिजिटल युगात पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होणार असून या प्रकल्पामुळे शहरातील सर्वसामान्य जनतेत सुरक्षिततेची भावना निर्माण होईल व पोलीस यंत्रणा अधिक सुसज्ज होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
उपरोक्त उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आ.कुणावार यांचेसह नागपूर परीक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, जिल्हा पोलिस अधिक्षक अनुराग जैन, माजी आमदार राजू तिमांडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड. सुधीर कोठारी, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित, ठाणेदार मनोज गभने, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.सागर कवडे, माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याकरीता हा डिजिटल सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष मैलाचा दगड ठरणार असून यासाठी आ.कुणावार यांनी पाठपुरावा केला होता.
उपरोक्त कार्यक्रमाचे वेळी पोलिस विभागाचे सर्व अधिकारी,कर्मचारी, शहरातील गणमान्य नागरीक तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.