- Breaking News, उद्घाटन, नागपुर समाचार

नागपूर समाचार : डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सव समारंभाचे उद्घाटन

▪️ सामान्यांना वेळेत न्याय देणारे विद्यार्थी घडावेत – केंद्रीय मत्री ना. श्री. नितीन गडकरी

नागपूर समाचार : आपले महाविद्यालय मोठे होत असताना विधी प्रक्रियेमध्ये देखील परिवर्तन आले पाहिजे. त्यात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर कसा होईल, याचा विचार झाला पाहिजे. यामध्ये वेळ हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सामान्य माणसाचा जो न्याय अपेक्षित होता, त्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. त्यादृष्टीने सामान्यांना वेळेत न्याय देणारे विद्यार्थी या महाविद्यालयातून घडावेत, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (मंगळवार) येथे व्यक्त केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सव समारंभाचे उद्घाटन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी व मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ना. श्री. गडकरी यांनी आठवणींना उजाळा दिला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, राज्यमंत्री अॅड. आशीष जयस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. राजेंद्र काकडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविशंकर मोर, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य समय बन्सोड व वामन तुरके, कुलसचिव डॉ. राजू हिवसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होत असताना गुणवत्ताही राखण्याचे मोठे आव्हान प्रत्येक शिक्षण संस्थेपुढे आहे. विधी महाविद्यालयाची गुणवत्ता आपल्या न्यायव्यवस्थेशी संबंधित आहे. या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी म्हणून माजी पंतप्रधान नरसिंह राव, माजी उपराष्ट्रपती मो. हिदायतुल्ला, न्यायाधीश मंडळींनी ही गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्यादृष्टीने काम करणारी पिढी या महाविद्यालयातून तयार होईल याचा मला विश्वास आहे.’

लोकशाही मूल्यांमध्ये बाबासाहेबांनी जे संविधान दिले आहे, त्यातील मूलभूत तत्त्वे खूप महत्त्वाची आहेत. ही मूल्ये कधीच बदलू शकत नाहीत. संविधानाच्या आधारावरच आपली लोकशाही टिकलेली आहे. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. वेळेत न्याय मिळाला पाहिजे, असे मला कायम वाटत असते. त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून कसे परिवर्तन करता येईल, याचा विचार करावा, असे आवाहनही ना. श्री. गडकरी यांनी केले.

‘आपल्या घरी आल्यासारखे वाटतेय’

‘माजी विद्यार्थी म्हणून या सोहळ्यात सहभागी होताना आनंद आणि अभिमानही वाटतोय. अगदी आपल्या घरी आल्यासारखे वाटत आहे. या महाविद्यालयाला शंभर वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे. मी या महाविद्यालयात होतो तेव्हा महाल आणि बर्डी अशा दोन शाखा होत्या. महाल शाखेतून मी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडून आलो होतो. इथूनच माझ्या विद्यार्थी जीवनाला सुरुवात झाली. आमच्यावेळी दिनकरराव मेघे प्राचार्य होते. याठिकाणी जे विद्यार्थी शिकले आणि ज्यांनी महाविद्यालयाचे नाव मोठे केले, त्यांचे कर्तृत्व जगापुढे गेले,’ अशी भावना ना. श्री. गडकरी यांनी व्यक्त केली.

नवीन इमारतीसाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नवीन इमारत बांधण्यासाठी सगळी मदत सरकारच्या वतीने करू. तीन वर्षांतच ही इमारत बांधून पूर्ण होईल, यासाठी प्रयत्न करा. निधीची कमतरता पडू देणार नाही. शताब्दी वर्षातच याचे भूमिपूजन करून काम सुरू झाले पाहिजे, अशी अपेक्षा आहे. पण त्याचवेळी जुन्या इमारतीच्या दुरुस्तीची योजना तयार करा. जुनी वास्तू जतन झाली पाहिजे. कारण या वास्तूशी आमच्या भावना जुळल्या आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *