- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपूर समाचार : ‘शिक्षणोत्सव’मुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत – आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी

▪️ शिक्षणोत्सव मध्ये विद्यार्थ्यांनी सादर केले समूह गायन, पथनाट्य

नागपूर समाचार : शाळा ही केवळ शैक्षणिक ज्ञान देण्यासाठी नसते तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्न करत असते. ‘शिक्षणोत्सव’ मुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळते. शिक्षणोत्सव सारख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत मिळते, असे प्रतिपादन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.

नागपूर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित ‘शिक्षणोत्सव २०२४-२५’ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून दोन दिवसीय सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन मंगळवार व बुधवार (ता २८ व २९ जानेवारी ) रोजी अध्यापक भवन, नागपूर येथे करण्यात आले आहे. मंगळवारी (ता.२८) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

याप्रसंगी शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम, सहायक शिक्षण अधिकारी श्री. संजय दिघोरे, शाळा निरीक्षक श्रीमती अश्विनी फेद्देवार , श्रीमती सीमा खोब्रागडे, श्री. जयवंत पिस्तुले, श्री विजय वालदे, शिक्षक संघाचे सचिव श्री. देवराव मांडवकर, शाळा निरीक्षक श्री प्रशांत टेंभुर्णे, मनपा शाळेतील सर्व शिक्षक गण उपस्थित होते.

मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात मनपाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी समूह गायन, पथनाट्य, नाटक अशा विविध स्पर्धांमध्ये भाग घेत उत्साहाने सादरीकरण केले. शिक्षणोत्सव हा नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांच्या बौद्धिक, शारीरिक, आणि सांस्कृतिक विकासासाठी आयोजित केला आहे. सांस्कृतिक स्पर्धेमध्ये मनपाच्या ११४ शाळांमधील ९०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. समूहगीत, कव्वाली, पथनाट्य, लोकनृत्य आणि एककला प्रदर्शन अशा विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी आपले उपजत कलागुण सादर करत उत्तम प्रदर्शन केले.

उद्घाटन प्रसंगी मनपा आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षण विभागाच्या प्रयत्नांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी मनपा शाळांद्वारे सतत प्रयत्न सुरु आहेत. यासाठी महानगरपालिका शाळांमध्ये क्रीडा व संगीत शिक्षकांची नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देताना ते म्हणाले, स्पर्धेमध्ये जय-पराजय महत्त्वाचा नाही, तर विद्यार्थ्यांनी आपले १०० टक्के योगदान देणे महत्त्वाचे आहे. यामुळे त्यांच्या कलागुणांना अधिकाधिक वाव मिळतो. तसेच त्यांनी शिक्षण विभागाच्या उपक्रमांचे नियमितपणे आयोजन करण्यावर भर देत या कार्यक्रमाला संस्थात्मक स्वरूप देण्याची गरज व्यक्त केली, ज्यामुळे भविष्यातील विद्यार्थ्यांना अधिकाधिक लाभ होईल. आयुक्त व प्रशासक मनपा नागपूर डॉ. अभिजीत चौधरी यांनी शिक्षणोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मा. अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांचे अभिनंदन केले.

स्पर्धेत इयत्ता १ ते ५, इयत्ता ६ ते ८, इयत्ता ९ ते ११ असे वर्गाप्रमाणे तीन गट करण्यात आले होते. ‘इन्साफ की डगर पे’,’हम हिंदुस्थानी’,’जयोस्तुते’,’वतन मेरे आझाद रहे तू’, अशा विविध गाण्याचे विविध समूहाने गायन केले. झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरण संवर्धन, रस्ते अपघात, जुन्या रूढी परंपरा निषेध, शेतकरी बांधवांची व्यथा अशा अनेक विषयांवर संदेश देत विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. या सांस्कृतिक स्पर्धांचे परीक्षक स्नेहल संगीत विद्यालय, संगीत संयोजक श्री मनोहर ढोबळे, सारस्वत संगीत विद्यालय संचालिका श्रीमती सोनाली बोहरपी, संगीत विशारद श्रीमती निलिमा शहाकार होते. यातील निवडक कार्यक्रम शिक्षणोत्सव कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिवशी १० फेब्रुवारी रोजी कविवर्य सुरेश भट्ट सभागृहामध्ये विध्यार्थी सादर करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *