- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपूर समाचार : मेयो रुग्णायालयातील पुरातन वृक्षांचे जतन आणि संवर्धन करा – आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी

▪️ वृक्ष तोडीचे प्रस्ताव नव्याने सादर करण्याचे निर्देश 

नागपूर समाचार : नागपूर महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (मेयो हॉस्पिटल) येथे प्रस्तावित अंतर्गत रस्त्याचे बांधकाम आणि क्रीडा मैदानाच्या विकासादरम्यान प्रस्तावित वृक्ष तोडण्याबाबत परवानगी प्रस्तावाच्या अनुषंगाने बुधवारी (ता. २९) पाहणी केली. यावेळी त्यांनी मेयो हॉस्पिटल परिसरातील पुरातन वृक्षांचे जतन आणि संवर्धन करण्याचे निर्देश दिले.

याप्रसंगी मेयो हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण, मनपा उपायुक्त (उद्यान) श्री. गणेश राठोड, वृक्ष संवर्धक अमोल चौरपगार, कार्यकारी अभियंता श्री. सचिन रक्षमवार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती वर्षा घुसे उपस्थित होते.

मेयो हॉस्पिटल यांचेकडून सादर करण्यात आलेल्या वृक्ष तोडीच्या प्रस्तावामध्ये समाविष्ट झाडांची मनपा आयुक्तांनी पाहणी केली. रुग्णालय प्रशासनाकडून २६ पुरातन आणि १०३ नॉन हेरिटेज झाडे तोडण्याचे प्रस्ताव नागपूर महानगरपालिकेला प्राप्त झाले आहे. पाहणीदरम्यान मनपा आयुक्तांनी उंबर, बकुळ वृक्षांचे पुनर्रोपण (ट्रान्सप्लांट) करण्याचे निर्देश दिले. तसेच अंतर्गत रस्ते आणि क्रीडा मैदानांमध्ये येणाऱ्या पुरातन वृक्षाचे संरक्षण आणि जतन करण्याबद्दलही निर्देशित केले.

मेयो हॉस्पिटल येथे नर्सिंग महाविद्यालय, मुलींसाठी वसतिगृह, बहू मजली वाहनतळ, क्रीडा संकुल, अंतर्गत रस्ते आणि मैदानाचा विकास करण्याचे काम राज्य शासनाच्या निधीतून सुरु आहे. आयुक्तांनी वृक्ष तोडीचे नवीन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश यावेळी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *