नागपूर समाचार : केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेला खासदार क्रीडा महोत्सव नागपूर शहरासह संपूर्ण विदर्भातील खेळाडूंसाठी महत्वाचे व्यासपीठ ठरले आहे. मागील २० दिवसांपासून सुरु असलेल्या क्रीडा महोत्सवाचा रविवारी २ फेब्रुवारी २०२५ रोजी समारोप होत आहे. यशवंत स्टेडियम येथे सायंकाळी ५.३० वाजता सातव्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाला सुरुवात होईल, कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असेल. अध्यक्षस्थानी खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी राहतील.
प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील. तसेच राज्याचे मंत्री आशिष जैस्वाल देखील उपस्थित राहतील. सुप्रसिद्ध सनम बेंडच्या लाईव्ह इन कॉन्सर्ट चे समारोपीय कार्यक्रमाला आयोजन करण्यात आले आहे. खासदार क्रीडा महोत्वाच्या समारोपीय कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट क्रीडा संघटक तसेच क्रीडा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. समारोपीय कार्यक्रम सर्वासाठी निःशुल्क आहे. मात्र कार्यक्रमस्थळी यशवंत स्टेडियम येथे प्रवेशासाठी प्रवेशिका अनिवार्य आहेत. कार्यक्रमाच्या प्रवेशिका नागरिकांकरिता खासदार क्रीडा महोत्सवाच्या विविध कार्यालयांमध्ये तसेच यशवंत स्टेडियम येथे उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
कार्यक्रमाच्या प्रवेशिका खासदार क्रीडा महोत्सवाचे सीताबर्डी येथील ग्लोकल मॉल मधील मुख्य कार्यालय, यशवंत स्टेडियम, नक्षत्र सभागृह प्रतापनगर, यश कॉम्प्लेक्स भरत नगर चौक, चिटणीस पार्क महाल, माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान रेशीमबाग चौक, गिरनार क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँक लि. सुनील हॉटेल जवळ आणि जिंजर मॉल जरीपटका या ठिकाणी उपलब्ध आहेत.
नागरिकांनी आपल्या प्रवेशिका प्राप्त करुन समारोपीय कार्यक्रमाला मोठ्या संख्येत उपस्थित रहावे, असे आवाहन खासदार क्रीडा महोत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे. १२ जानेवारी २०२५ खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन झाले. २० दिवस शहरातील ७३ क्रीडांगणांवर ५८ खेळांच्या स्पर्धा पार पडल्या. विविध ५८ खेळांच्या तब्बल २९०० चमू, ६००० ऑफिसियल्स, 78 हजार खेळाडूंचा महोत्सवात समावेश होता. एकूण १३१०० सामने खेळविण्यात आल्या यात खेळाडूंना १२३१७ मेडल्स आणि ७६२ ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या. स्पर्धेतील विजेत्यांना १ कोटी ५० लक्ष रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात आले.