नागपूर समाचार : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना आज (06 फेब्रुवारी) नागपूरात खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना जिंकून मालिकेची विजयी सुरुवात केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा सामना 4 विकेट्स आणि जवळपास 11 षटके राखून जिंकला. टीम इंडियाच्या विजयात उपकर्णधार शुबमन गिलने निर्णायक खेळी खेळली. त्याने 87 धावा केल्या, तसेच श्रेयस अय्यरने देखील 59 धावांची आक्रमक खेळी खेळली. ज्यात त्याने 9 चाैकार आणि 2 षटकार मारले.
248 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. संघाने 19 धावांवर दोन विकेट्स गमावल्या. पण यानंतर श्रेयस अय्यर आणि शुबमन गिलने मोलाची 94 धावांची भागीदारी केली. पण 113 धावसंख्येवर श्रेयस अय्यरच्या रुपाने संघाला तिसरा धक्का बसला. अय्यरला जेकब बेथलने बाद केले. यानंतर पाचव्या क्रमांकवार आलेल्या अक्षर पटेलने देखील अर्धशतकी खेळी खेळली. त्याने 47 चेंडूत 52 धावा केल्या. अक्षर पटेलने गिलसोबत 108 धावांची भागीदारी रचली. ज्यामुळे भारताचा विजयाचा मार्ग सोपा झाला. उपकर्णधार गिलचे शतक मात्र हुकले. तो 87 धावांवर बाद झाला.
इंग्लंड संघ टाॅस जिंकून पहिल्या डावात खेळताना खूपच आक्रमक सुरुवात केली. संघाने 8 षटकांतच 70 धावा केल्या. पण 9व्या षटकात फिल साॅल्ट धावबाद झाला. यानंतर सामना भारताच्या बाजूने वळला. संघाने अवघ्या 2 धावांत 3 विकेट गमावल्या. यानंतर कर्णधाराने एक टोकाकडून डाव सांभाळला. बटलरने जेकब बेथेलसोबत 59 धावांची भागीदारी केली. ज्यात दोघांनी अर्धशतकी खेळी खेळली. बटलरने 52 तर बेथलने 51 धावा केल्या. पण शेवटी संघाला 248 धावांपर्यंतच पोहचता आले. गोलंदजीत भारताकडून रवींद्र जडेजा आणि हर्षित राणाने सर्वाधिक 3-3 विकेट्स घेतल्या.