- Breaking News, आयोजन, धार्मिक , नागपुर समाचार

नागपूर समाचार : नागपूरकरांना मिळणार पवित्र कुंभस्नानाची अनुभूती; भव्‍य ‘महाकुंभ प्रयाग योग’ चे आयोजन 

▪️ 15 फेब्रुवारी रोजी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांस्‍कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्‍या हस्‍ते आरती

▪️ 16 फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्‍थ‍िती

नागपूर समाचार : प्रयागराज येथे सध्या सुरू असलेल्या महाकुंभात अनेक साधुसंत आणि नागरिकांनी सहभाग घेऊन त्रिवेणी संगमावर स्नानाचा लाभ घेतला. ज्यांना तेथे जाणे शक्य झाले नाही अशांना त्या महाकुंभातील पवित्र स्नानाची औपचारिक दिव्‍य अनुभूती मिळावी, याकरिता व्हॅल्युएबल ग्रूपच्‍यावतीने व सत्‍संग फाउंडेशनच्‍या सहकार्याने 15 ते 16 फेब्रुवारी दरम्‍यान भव्‍य ‘महाकुंभ प्रयाग योग’ चे आयोजन करण्‍यात आले आहे. 

रेशीमबाग मैदानावर त्‍यानिमित्‍त दोन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम, भक्ती संगीत, सत्संग, कीर्तन, भजन, प्रवचन या कार्यक्रमांसोबतच महाराष्ट्रातील प्रसिद्ध ब्रम्‍हवृंदाद्वारे ‘शिवशक्ती याग’, संतांच्या पादुका व जलकुंभ अभिषेक, पवित्र जलाभिषेक असा भरगच्‍च कार्यक्रम राहणार आहे. 

प्रयागराज येथील संगमातील हजारो लिटर पवित्र जल रामटेकमार्गे नागपुरात आणले जात आहे. बुधवारी, 12 रोजी हे पवित्र संगम जल रामटेक येथे पोहोचणार असून येथे त्‍याची गांधी चौक ते गडमंदिर अशी भव्‍य शोभायात्रा काढली जाणार आहे. नागरिकांनी या शोभायात्रेत मोठ्या संख्‍येने सहभागी व्‍हावे, असे आवाहन करण्‍यात आले आहे. 13 तारखेला गडमंदिरात या पवित्र जलाद्वारे अभिषेक केला जाणार असून त्‍यानंतर हे पवित्र जल कलशाद्वारे नागपुरातील टेकडी गणेश मंदिर, कल्याणेश्वर मंदिर तेलंगखेडी, रामनगरचे राममंदिर, प्रतापनगरचे दुर्गामंदिर, महालचे कल्याणेश्वर व पूर्व नागपुरातील रमणा मारुती येथे आणले जाणार आहे. 

शनिवार, 15 फेब्रुवारी रोजी ‘श्री गुरू पादुका दर्शन व संगम जल अभिषेक सोहळा’ आयोजित करण्‍यात आला आहे. प्रयागराज येथून आलेले हे पवित्र जल श्री गजानन महाराज चौक पासून भव्‍य शोभायात्रेच्‍या माध्‍यमातून रेशीमबाग मैदानापर्यंत पोहचेल. संगमाच्या या पवित्र जलाने श्री महेश्वरनाथ बाबाजी महाराज, गजानन महाराज, स्वामी समर्थ महाराज, साईनाथ महाराज, पंत महाराज बाळेकुंद्री, रामदास स्वामी, श्रीधर स्वामी या संतांच्या पादुकांवर अभिषेक करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्रींची महाआरती करण्‍यात येणार आहे. यावेळी सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांची विशेष उपस्‍थ‍िती राहील. सत्‍संग फाउंडेशनचे संस्थापक व आध्यात्मिक गुरू श्री एम यांच्‍या आशीर्वचनांचा लाभ भाविकांना घेता येईल.   

15 व 16 फेब्रुवारी आधुनिक जलप्रोक्षण तंत्रांच्‍या सहायाने भाविकांना महाकुंभातील पवित्र स्‍नानाची औपचारिक दिव्‍य अनुभेती घेता येणार आहे. 

रविवार, 16 फेब्रुवारीला केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांची विशेष उपस्‍थ‍िती राहील. 

या कार्यक्रमाचे आयोजक व्‍हॅल्‍यूएबल ग्रुप हे असून सत्‍संग फाउंडेशनेचे त्‍यांना सहकार्य लाभत आहे. भाविकांनी मोठ्या संख्‍येने या पवित्र क्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सत्‍संग फाऊंडेशनचे पद्मश्री श्री एम आणि व्हॅल्युएबल ग्रूपचे अमेय हेटे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *