▪️ पंतप्रधान नरेंद्र मोदी देशास संबोधित करणार
नागपूर समाचार : 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करण्यात येणार असून त्यानिमित्ताने शहरात ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेचे आयोजन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमास शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. या औचित्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृष्यप्रणालीद्वारे देशास संबांधित करणार आहेत असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात त्यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, क्रीडा व सेवा संचालनालयाचे उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, मनपाचे क्रीडा अधिकारी पियुष आंबुलकर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पदयात्रेचा शुभारंभ नागपूर महापालिका कार्यालयातून होणार आहे. संविधान चौक, झिरोमाईल, व्हेरॉयटी चौक, झाशी राणी चौकातून मार्गस्थ होऊन परत व्हेरायटी चौक, महाराज बागमार्गे विद्यापीठ चौकमार्गे मध्यवर्ती वास्तु संग्रहालय (अजब बंगला) येथे समारोप होणार आहे. यादरम्यान विविध चौकात मल्लखांब, दाडपट्टा, कुस्ती, आदिवासी नृत्य, योग, लेझिम पथक,पारंपारिक पोषाखातील मुले, स्वच्छता अभियान, समुहगानाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या पदयात्रेदरम्यान पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच आरोग्यासाठी ॲम्ब्युलंसची सुविधा करण्यात यावी. पोलीस विभागाने या दरम्यान वाहतूक व्यवस्था चोख ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी संबंधितांना दिले.
पदयात्रेचा समारोप वस्तु संग्रहालयात झाल्यानंतर मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे प्रदर्शन पाहण्यास मिळणार आहे. भवन्स विद्यालय येथे विद्यार्थी राहतील. सकाळी 9.30 वाजता पंतप्रधान शिव जयंतीनिमित्त देशास संबोधित करतील.